सोनियांचा संदेश काँग्रेसजन घेणार का?


मनी लाँडरिंग प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची अखेर सुटका झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आदल्या दिवशी शिवकुमार त्यांना जामीन मंजूर केला होता आणि त्यानुसार ते बाहेर आले आहेत. मात्र तत्पूर्वी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांची भेट घेऊन एक चांगला संदेश दिला. आपल्या नेत्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष उभ्या असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

उच्च न्यायालयाने शिवकुमार यांना 25 लाख रुपयांचा जात मुचलका आणि दोन जामीनदारांच्या अटीवर तुरुंगातून बाहेर येण्यास परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयाच्या परवानगीशिवाय ते भारत सोडून जाऊ शकणार नाहीत. तसेच न्यायालयाने शिवकुमार यांना गरजेनुसार चौकशीला सहकार्य करण्याचे निर्देशही दिले आहेत.

बुधवारी रात्री 9.30 वाजता शिवकुमार तिहारच्या बाहेर आले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष, समर्थक, कुटुंबीय आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे आभार मानले. त्यामागे हेच कारण होते. “माझ्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मी आभार मानू इच्छितो. माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे आभार,” असे ते म्हणाले. कारण बुधवारी सकाळीच कर्नाटकचे सोनिया गांधी यांनी तिहार तुरुंगात जाऊन शिवकुमार यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

शिवकुमार हे गुरुवारी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अहमद पटेल यांची भेट घेण्याची शक्यता आहे, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारी ते बंगळुरूला परत येणार आहेत. कर्नाटक कॉंग्रेसने त्यांचे भव्य स्वागत करण्याची योजना आखली असल्याचे सांगितले जाते.

शिवकुमार यांच्यावर कर चुकवणे आणि कोट्यावधी रुपयांच्या हवाला व्यवहारात गुंतल्याचा आरोप आहे. त्यांना सक्तवसुली संचालनालयाने 3 सप्टेंबर रोजी अटक केली होती आणि त्यांची न्यायालयीन कोठडी 25 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली होती. गेल्या वर्षी बेंगळुरूच्या विशेष न्यायालयासमोर प्राप्तिकर खात्याने त्यांच्यावर खटला दाखल केला होता. त्या खटल्यातील आरोपपत्रावर ही कारवाई आधारित होती. नवी दिल्लीतील कर्नाटक भवनमधील कर्मचारी हनुमंतय्या आणि इतरांच्या मदतीने हवाला व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

शिवकुमार यांची ओळख आहे ती मुख्यतः काँग्रेस पक्षाचे समस्यानिवारक म्हणून. तब्बल सात वेळा आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. कर्नाटकातील आधीच्या एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस-जेडीएस युतीचे ते प्रमुख आधारस्तंभ होते. हे सरकार संकटात आले, की शिवकुमार यांना पाचारण केले जायचे आणि शेवटच्या क्षणापर्यंत शर्थ करून ते सरकार वाचवत असत. मात्र यावर्षी जुलैमध्ये अखेर त्यांचे प्रयत्न कमी पडले आणि भाजपाने सत्ता हस्तगत केली होती.

या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या भेटीकडे पाहायला हवे. शिवकुमार यांच्याशी सोनिया गांधींची भेट सुमारे 30 मिनिटे चालली. काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्याने तिहार जेलला भेट देण्याची गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे. सप्टेंबर महिन्यात सोनियांनी आयएनएक्स मीडिया प्रकरणात न्यायालयीन कोठडीत देण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली होती. दिल्ली उच्च न्यायालयात शिवकुमार यांच्या जामिनावरील सुनावणी होण्याच्या काही तास अगोदरच सोनियांनी शिवकुमार यांची भेट घेतली. शिवकुमार यांना जामीन मिळो किंवा न मिळो, परंतु पक्ष त्यांना पूर्णपणे पाठिंबा देईल हे दाखवण्याचा त्यांचा हेतू होता आणि तो अत्यंत स्तुत्य होता.

ईडीच्या कारवाईनंतर शिवकुमार हे पूर्णपणे एकटे पडले होते. त्यांच्यावरील आरोप खरे असोत वा नसोत, मात्र या अडचणीच्या वेळेस पक्षाने त्यांना आधार देण्याची गरज होती. सोनिया यांच्या कृतीतून तो संदेश गेला. हाय कमांडने त्यांना पूर्ण पाठिंबा दिल्याचे चित्र त्यातून उभे राहिले. कर्नाटक काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत आणि त्यातील अनेकांना शिवकुमार आतच राहणे हवे होते.

मात्र ही क्षुल्लक भांडणाची वेळ नाही आणि पक्षाने आपल्या नेत्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, हे काँग्रेसजनांना कोणीतरी सांगण्याची गरज होती. ते काम सोनियांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विस्कळीत झालेल्या काँग्रेस पक्षाचे कान त्यांनी अलगदपणे टोचले आहेत. मात्र काँग्रेसजन ते शिकणार का?

Leave a Comment