ईडीच्या कारवाईचे राजु शेट्टींकडून स्वागत… पण


कोल्हापूर – राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी शरद पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वागत केले आहे. दरम्यान, जसा गुन्हा शरद पवार यांच्यावर दाखल झाला तसाच गुन्हा चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा व्हावा, अशी मागणी शेट्टींनी केली आहे. लवकरच उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी शिरोळमध्ये बोलताना दिला आहे.

ईडीकडून शरद पवार यांच्यासह अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वप्रथम या घोटाळ्याबाबत याचिका दाखल करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शेट्टींनी शिरोळमध्ये बोलताना ईडीकडून झालेल्या कारवाईचे स्वागत करत राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. तसेच राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर गुन्हा दाखल झाला असला, तरी ज्यांनी कर्ज घेतले ते मोकाटच आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. कर्ज घेतलेल्या अनेकांनी सध्या भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे, या भाजपवासींवर ईडी कारवाई करणार का, असा सवालही राजू शेट्टींनी यावेळी उपस्थित केला.

राजू शेट्टी यांनी त्याचबरोबर चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी केली आहे. उच्च न्यायालयात याबाबत लवकरच याचिका दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले. ईडीकडून निवडणुकीच्या वातावरण निर्मितीपोटी अशी कारवाई केली जात असल्याची टीका सुद्धा राजू शेट्टी यांनी केली.

Leave a Comment