महाराणीच्या बायोपिकचे नाट्य!


तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचे जीवन आणि रूबाब महाराणीसारखाच होता. राजकारणात त्यांच्यासारखे कर्तृत्व गाजविणारे फार थोडी व्यक्तिमत्त्वे झाली आहेत. त्यामुळेच त्यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याचा विचार कोणी केला नसता तर नवलच. त्यानुसार एकीकडे त्यांच्या बायोपिकची तयारी निर्माते आणि दिग्दर्शक करत असतानाच त्यावर नाट्यही सुरू झाले आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या जीवनावर चित्रपट बनविण्याची घोषणा अनेक चित्रपट निर्मात्यांनी केली होती. त्यातील काही चित्रपट हे सध्या निर्मिती अवस्थेत आहेत. असाच एक चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर तयार होत असून तलैवी असे या चित्रपटाचे नाव असेल. बॉलिवूडची आघाडीची नायिका कंगना रनौत या चित्रपटात जयललितांची भूमिका करणार आहे. तमिळ, तेलगू आणि हिंदी या भाषांमध्ये हा चित्रपट एकाच वेळी तयार होणार आहे. मात्र हे सगळे प्रकरण एवढे सोपे नाही. या चित्रपटाच्या संदर्भात माध्यमांमध्ये उलटसुलट बातम्या आल्या आहेत. आर्थिक प्रश्नावरून हा बायोपिक होत नाहीये, अशा अफवा काही उपद्रवी व्यक्तींनी पसरविल्या होत्या. या चित्रपटाला आव्हान ठरले ते एका वेब मालिकेचे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक गौतम मेनन याने क्वीन नावाच्या वेब मालिकेचे चित्रीकरण सुरू केले आहे. यात ‘बाहुबली’तील शिवगामिनी देवी म्हणजेच रम्या कृष्णन हिची प्रमुख भूमिका असणार आहे. क्वीन नावाची ही वेब मालिका खासगी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सादर केली जाईल, अशी अधिकृत घोषणा गौतम मेनन यांनी केली होती. मात्र क्वीन हा जे. जयललिता यांचा बायोपिक आहे, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेले नाही. परोपकारी भावनेने आणि कठोरपणे राज्य करणाऱ्या एका राजकीय महिला नेत्याची कथा या मालिकेत असल्याचे या संदर्भातील प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या मालिकेच्या पहिल्या पोस्टरमध्ये रम्या कृष्णन या जयललितांप्रमाणेच काळ्या आणि लाल रंगाची किनार असलेल्या पांढऱ्या साडीत दिसतात. ही मालिकाही हिंदी, तमिळ, तेलुगु व बंगाली भाषेत असेल. या वेब मालिकेशी स्पर्धा नको म्हणून हा चित्रपट थांबविण्यात आला आहे, असे इतरांचे म्हणणे आहे.

या अफवांमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर कऱण्यासाठी स्वतः जयललितांच्या नातेवाईकांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. दिग्दर्शक ए.एल. विजय यांनी कंगना राणावत हिला घेऊन चित्रपट काढण्याची तयारी केली आहे. या चित्रपटासाठी सर्व संभाव्य माहिती आणि परवानग्या त्यांनी घेतल्या आहेत. दुसरीकडे मेनन यांनी कथित वेब सीरिजबाबत कोणत्याही प्रकारे आपल्याशी संपर्क केलेला नाही, असे जय़ललितांचे पुतणे दीपक जयकुमार यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर क्वीन नावाच्या या वेब मालिकेत आपल्या आत्याबद्दल चुकीची माहिती दिली तर मेनन यांना गंभीर परिणामास सामोरे जावे लागेल, असा इशाराही दीपक यांनी दिला आहे.

माध्यमांमधून या प्रसिद्धी पत्रकाची आणि पोस्टरची माहिती समजल्यानंतर दीपक यांनी गौतमला इशारा दिला होता. “गौतम मेनन त्यांच्या मालिकेत कोणत्या प्रसिद्ध राजकीय व्यक्तीबद्दल बोलत आहेत हे मी सांगू शकत नाही. अम्मा (जयललिता) याही राजकीय व्यक्तिमत्त्व होत्या आणि त्यांचे सार्वजनिक जीवन हा एक ज्ञात इतिहास आहे. त्यांनी त्यांचे तिचे राजकीय जीवन चित्रित केले असेल तर माझी काही हरकत नाही. मात्र माझ्याकडून व माझी बहीण दीपाकडून योग्य संमती घेतल्याशिवाय त्यांचे खासगी जीवन चित्रित करण्याचा कोणालाही अधिकार नाही. जर त्यांनी माझ्या आत्याबद्दल काही वैयक्तिक चित्रण केले असेल तर मी यास परवानगी देणार नाही आणि आमच्या परवानगीशिवाय क्वीन दाखवणार असतील तर आम्ही मानहानीचा खटला दाखल करू,” असे त्यांनी म्हटले आहे.

जयललिता जीवंत असताना त्यांचे राजकीय व खासगी जीवन वादग्रस्तच होते. त्याच प्रमाणे त्यांचा मृत्यूही वादग्रस्त ठरला आणि मृत्यूनंतरचा वारसाही वादग्रस्त राहिला. इतका, की त्यांच्या वारसाबद्दलचा वाद मद्रास उच्च न्यायालयात पोचला आणि न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशानुसार, जयललिता यांचे कायदेशीर वारस म्हणून भाचे दीपक आणि पुतणी दीपा यांना मान्यता देणे राज्य सरकारला बंधनकारक करण्यात आले आहे. चंदेरी पडद्यावर प्रसिद्धी मिळवून वादग्रस्त आयुष्य घालवलेल्या जयललिता यांच्या पडद्यावरील चित्रणाबद्दलही वाद निर्माण व्हावा, हा बाकी काव्यगत न्याय म्हणावा!

Leave a Comment