सफर बडोद्याच्या लक्ष्मीविलास पॅलेसची


भारतातील अनेक प्रांतांमध्ये निरनिराळ्या काळांमध्ये निरनिराळ्या शासकांच्या सत्ता अस्तित्वात होत्या. या शासकांच्या काळामध्ये निर्माण केले गेलेले अनेक भव्य राजवाडे आजही भारतामध्ये अस्तित्वात असून, तत्कालीन वास्तुकलेचे हे उत्तम नमुने म्हणायला हवेत. त्यातीलच एक भव्य वास्तू, म्हणजे बडोदा येथे उभा असणारा लक्ष्मी विलास पॅलेस. बडोद्याचे तत्कालीन शासक गायकवाड वंशज असून, महाराजे सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांनी १८९० साली या राजनिवासाचे निर्माण करविले होते. या राजनिवासाची रचना युरोपियन आणि भारतीय वास्तुकेलेचे मिश्रण म्हणता येईल.

इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांचे औपचारिक निवासस्थान असलेल्या बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही भव्य असलेल्या या राजनिवासाच्या परिसरामध्ये विस्तीर्ण गोल्फ कोर्स आहे. या राजनिवासाच्या परिसरामध्ये सहाशे वर्षांपूर्वी निर्माण करविली गेलेली एक बाव ( स्टेपवेल ) असून, एक प्राणीसंग्रहालय आणि वस्तूसंग्रहालयही या ठिकाणी पहावयास मिळते. या वस्तूसंग्रहालयाच्या ठिकाणी पूर्वीच्या काळी राजपरिवारातील मुलांसाठी खासगी शाळा असून, या शाळेमध्ये जाण्यासाठी महाराजांनी मुलांसाठी खासगी ‘मिनी ट्रेन’ ही तयार करविली होती.

आजही गायकवाड घराण्याचे वंशज अस्तित्वात असून, लक्ष्मी विलास पॅलेसच्या पहिल्या मजल्यावर या राजपरिवाराचे वास्तव्य असते. विस्तीर्ण हिरवीगार मैदाने, उत्तम वास्तुकेलेने नटलेल्या वास्तू आणि शहराच्या गोंगाटापासून दूर अशी ही आलिशान वस्तू आजही दिमाखात उभी आहे. या वास्तूच्या रचनेमध्ये इटालियन मार्बल, स्टेन्ड ग्लास, वेनेशिय्न मोझेक इत्यादी गोष्टींचा मुबलक वापर आढळतो. या वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार राजमहाल रोडवर आहे.

येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची सोय असून, प्रवेशासाठी भारतीय नागरिकांना २२५ रुपये, तर परदेशी पर्यटकांना ४०० रुपये आकारले जातात. मात्र छायाचित्रे घेण्याची मुभा या ठिकाणी नाही. संपूर्ण राजनिवास फिरून पाहताना त्याचा इतिहास सांगण्यासाठी ऑडियो गाईडची व्यवस्थाही या ठिकाणी केली गेली आहे. वास्तूमध्ये सर्वत्र शाही सुरक्षा कर्मचाऱ्यांचा कडक पहारा असतो. त्यामुळे एखाद्या पर्यटकाने गुपचूप एखादे छायाचित्र घेतलेच, तरी चाणाक्ष सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नजरेतून हे सुटत नाही, आणि पर्यटकाला छायाचित्र त्वरित ‘डीलीट’ करण्यास सांगण्यात येते.

राजनिवास पाहण्यासाठी ‘गाईडेड टूर’ उपलब्ध असून, याद्वारे पर्यटकांना शाही बगीचा, शस्त्रसाठा असलेला कक्ष, राज्याभिषेकाच्या खास प्रसंगी वापरण्यात येत असलेला कक्ष, ‘हाथी हॉल’, ‘दरबार हॉल’ , नवलखी स्टेपवेल इत्यादी ठिकाणे पाहता येतात. बडोद्याचा हा भव्य राजमहाल नवरात्रीच्या दिवसांत असंख्य दिव्यांनी सुशोभित केला जातो. त्याच काळामध्ये येथे पर्यटकांची विशेष गर्दी पहावयास मिळते.

Leave a Comment