वैज्ञानिकांनी बनविला साडेचार हजार वर्षांपूर्वीचे यीस्ट वापरून चविष्ट ब्रेड !


शेमस ब्लॅकली नामक अमेरिकन वैज्ञानिकाने प्राचीन इजिप्शियन भांड्यांमध्ये साठविलेल्या यीस्टचा वापर करून हे यीस्ट धान्यामध्ये मिसळून त्यापासून उत्तम ब्रेड तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. शेमस हे भौतिकशास्त्रनिपुण असून ते ‘फ्लाईट कॉम्बॅट’ नामक अमेरिकेमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या व्हिडियो गेमचे जनकही आहेत. शेमस यांनी इजिप्तमध्ये उत्खननामध्ये सापडलेल्या काही भांड्यांमध्ये सापडलेले ‘डॉर्मन्ट’ म्हणजेच निष्क्रिय झालेले यीस्ट, रासायनिक प्रक्रियेद्वारे पुन्हा सक्रीय करून त्या काळी जश्या प्रकारची धान्ये ब्रेड बनविण्यासाठी वापरली जात असत, तश्याच धान्यांचा वापर करून त्यायोगे अतिशय चविष्ट ब्रेड बनविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. अश्या प्रकारचा प्रयोग करणारे शेमस हे एकमेव शास्त्रज्ञ नसून, यापूर्वीही वैज्ञानिकांनी पाच हजार वर्षांपूर्वीच्या यीस्टचा वापर करून बियर बनविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.

इतक्या प्राचीन काळचे यीस्ट वापरून ब्रेड बनविला जाण्याचा प्रयोग सफल होण्यासाठी पुष्कळ अवधी लागला असून या कामी शेमस यांना इजिप्टोलॉजिस्ट सेरेना लव्ह आणि मायक्रोबायोलॉजिस्ट रिचर्ड बोमन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यांच्या समवेत शेमस यांनी बोस्टन येथील म्युझियम ऑफ फाईन आर्ट्स आणि हार्वर्ड विद्यापीठामध्ये जतन करून ठेवलेल्या प्राचीन इजिप्शियन पॉटरीमधून हे यीस्ट मिळविले आणि त्यानंतर त्यावर निरनिराळ्या प्रक्रिया करून हे ईस्ट सक्रीय केले. साडेचारहजार वर्षांपूर्वी मैद्यासारखा पदार्थ अर्थातच अस्तित्वात नसल्याने विशिष्ट प्रकारचे धान्य वापरूनच त्याकाळी ब्रेड तयार केला जात असे. त्यामुळे शेमस यांनी संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास करुन प्राचीन काळी ज्या पद्धतीने, ज्या धान्याचा वापर करून ब्रेड बनविला जात असे, तश्याच पद्धतीने, त्याच धान्याचा वापर करून हा ब्रेड बनविण्यात यश संपादन केले आहे.

हा ब्रेड बनविण्यासाठी शेमस यांनी बार्ली, आईनक़ॉर्न आणि कामुट नामक धान्यांच्या मिश्रणाचा वापर केला असून, या धान्यांमध्ये सक्रीय झालेले यीस्ट घालून हे मिश्रण काही तासांसाठी मुरवत ठेवले. हे मिश्रण पुरेसे फुगल्यानंतर ओव्हनमध्ये घालून याचा ब्रेड बनविण्यात आला. ब्रेड बनविण्यासाठीचे सर्व साहित्य प्राचीन काळी वापरले जात होते तसे असले, तरी हा ब्रेड मात्र अत्याधुनिक ओव्हनमधेच भाजला गेला असल्याचे समजते.

Leave a Comment