पाकिस्तानी क्रिकेट संघाला सुधारण्याचा पंतप्रधान आणि माजी दिग्गज खेळाडू इम्रान खान यांनी विडा उचलला आहे. माझे शब्द लक्षात ठेवा, मी पाकिस्तानला पुढील विश्वचषकापर्यंत सर्वोत्तम संघ बनवून दाखवणे, असे त्यांनी म्हटले आहे.
सध्या तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर पंतप्रधान इम्रान खान असून त्यांनी हे वक्तव्य मूळ पाकिस्तानी असणाऱ्या पण, सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना उद्देशून केले. ते म्हणाले, मी यंदाच्या विश्वचषकानंतर पाकिस्तानच्या संघामध्ये सुधार करणार आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत माझी खूप निराशा झाली, पण तुम्ही पाकिस्तानच्या चांगल्या संघाला आगामी विश्वचषकात पाहाल. यासाठी यंत्रणेत काही बदल करावे लागतील आणि नवीन खेळाडूंनाही संधी द्यावी लागेल.
इम्रान खान यांनी 1992 मध्ये आपल्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. पाकिस्तानला त्यानंतर एकदाही विश्वचषक उंचावता आलेला नाही. कर्णधार सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर राहावे लागले होते.