नाशिक कारागृहातील कैदी बनले मूर्तिकार, घडवत आहेत सुंदर गणेशमूर्ती


गणेशोत्सव आता अवघा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मूर्तिकार मंडळी उत्तमोत्तम गणेशमूर्ती घडविण्यात व्यग्र आहेत. तिथेच नाशिक मध्यवर्ती कारागृहातील वीस कैदी देखील मूर्तीनिर्माणाचे कौशल्य पणाला लावीत गणेश मूर्ती घडविण्याच्या कामामध्ये मग्न आहेत. मागील वर्षी या वीस कैद्यांनी चौदाशे लहान-मोठ्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती घडविल्या आणि या मूर्तींची विक्री करून तब्बल तेरा लाख रुपये कमाविले. यंदाच्या वर्षी या कैद्यांनी घडविलेल्या मूर्तींना आधीपासूनच मोठी मागणी असून, आतापर्यंत या कैद्यांनी आठशे मूर्ती घडविल्या आहेत. यामध्ये नऊ फुट उंचीची श्री चिंतामणीची रत्नांनी सजविलेली मूर्ती, यंदाच्या उत्सवाची खासियत ठरणार आहे.

२०१७ साली कैद्यांच्या पुनर्वसनाचे उद्दिष्ट मनामध्ये ठेऊन त्यांना काही तरी व्यवसाय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने काही कैद्यांचा मूर्तीकलेशी परिचय करविण्यात आला. केवळ दोनच वर्षांमध्ये या प्रयोगाने एका यशस्वी व्यवसायाचे रूप धारण केले असून, या कैद्यांनी घडविलेल्या मूर्तींना दर वर्षी वाढती मागणी आहे. मागील वर्षी कैद्यांनी घडविलेल्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी आल्या, तेव्हा इतर मूर्तीकारांनी आपल्याकडील मूर्ती त्यापेक्षा कमी भावामध्ये विकण्यास सुरुवात केली. पण त्यानंतर, कैद्यांनी घडविलेल्या मूर्ती आर्थिक फायद्यासाठी विकण्यात येत नसून, कैद्यांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उद्योग सुरु केला गेला असल्याचे समजल्यानंतर इतर मूर्तीकारांचा विरोधही मावळला. बाजारामध्ये सहज उपलब्ध नसलेल्या इको फ्रेंडली गणेशमूर्ती कैद्यांच्या द्वारे बनविल्या जात असल्याने या मूर्तींना चांगली मागणीही असल्याचे कारागृहाच्या व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेश मूर्ती घडविण्याचे काम कैद्यांनी डिसेंबर २०१८ सालीच सुरु केले असून, वीस निरनिराळ्या प्रकारांमध्ये या मूर्ती घडविल्या जातात. यामध्ये टिटवाळा मंदिर गणेशमूर्ती, दगडूशेठ हलवाई गणेशमूर्ती, आसनावर विराजमान गणेशमूर्ती, गरुडगणेश, लालबागचा राजा गणेशमूर्ती, राधेकृष्ण गणेश, मूषक रथावर आरूढ गणेश इत्यादी प्रकारांमध्ये इको फ्रेंडली गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. या मूर्ती घडविण्यासाठी कैद्यांना स्वतंत्र कक्ष कारागृहामध्येच उपलब्ध करवून देण्यात आला असून, उत्सवाचे दिवस जवळ येत असताना सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत मूर्ती घडविण्याचे काम सुरु असते. या मूर्ती घडविण्यासाठी नैसर्गिक कच्च्या मालाचा वापर करण्यात येतो. हा सर्व कच्चा माल आणि मूर्तीच्या सजावटीसाठी लागणारे रंग, निरनिराळे रंगीत खडे, इत्यादी सामान मुंबईहून मागविले जाते. यंदाच्या वर्षी पेपर पल्पने बनविली गेलेली श्री चिंतामणीची नऊ फुट उंचीची मूर्ती सर्वाधिक किंमतीची असणार आहे.

Leave a Comment