ट्रोल करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला स्वरा भास्करने झापले


देशात घडणाऱ्या अनेक मुद्द्यांवर अभिनेत्री स्वरा भास्कर अगदी परखड आणि रोखठोक मत मांडत असते. ती ट्विटरवर बऱ्याच प्रमाणात सक्रिय असते आणि ती आपले परखड मत व्यक्त केल्यामुळे अनेकदा वाद देखील ओढावून घेत असते. स्वरा भास्कर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. स्वरा बिहारच्या बेगुसरायमध्ये कन्हैय्या कुमार आणि दिल्लीत आम आदमी पक्षाच्या प्रचारसभेमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले होते, तिला त्यामुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. स्वरा नुकतीच परदेशातून परतली असून सोशल मीडियावर ती पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे.


तिने झारखंडमध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या तबरेज अन्सारी प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. तसेच तिने ट्विटरद्वारे या हत्येविरोधात 26 जून रोजी दिल्लीत कँडल मार्चमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. याच दरम्यान स्वराच्या ट्विटला विपूल अग्रवाल नावाच्या एका आयपीएस अधिकाऱ्याने रिप्लाय केला आणि स्वरा तू काही निवडक लोकांसाठीच तुझे स्वर वापरतेस हे तू पुन्हा सिद्ध केले, असे ट्विट करुन तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

स्वरानेही त्यावर रोखठोक उत्तर दिले. सर, मी एक अभिनेत्री आहे…मी निवडक असल्याने किंवा नसल्याने कोणाला काही नुकसान होणार नाही… पण तुम्ही आयपीएस अधिकारी आहात…तुम्ही निवडक असाल तर देशाला नुकसान पोहोचते…आणि नंतर त्यामुळे तबरेज अन्सारी सारख्या घटना जन्माला येतात…त्यामुळे मला ट्रोल करण्याऐवजी कृपया स्वतःचे काम करा…किमान ज्या भारतीय संविधानाची शपथ घेतली, त्याच्यासाठी तरी आवाज उठवा, असं सडेतोड उत्तर स्वराने दिले आहे. तिचे हे उत्तर नेटकऱ्यांना चांगलंच पसंतीस पडले असून अनेकांनी या आयपीएस अधिकाऱ्यालाच खडेबोल सुनावले आहेत.


गेल्या 19 जून रोजी चोरी केल्याच्या संशयावरून सेराईकेला-खारसावान जिल्ह्यात संतप्त जमावाने तबरेज अन्सारी याला पकडून खांबाला बांधले व जबर मारहाण केली होती. त्यानंतर त्याचा 22 जून रोजी मृत्यू झाला होता. ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ म्हणण्याची सक्तीही जमावाने अन्सारी याला केली गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसले होते.

Leave a Comment