विश्वचषकात मोहम्मद शमीने रचला इतिहास


भारताने विंडीजविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात १२५ धावांनी विजय मिळवला. भारताने कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकाच्या जोरावर विंडीजपुढे २६८ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. पण विंडीजच्या फलंदाजांनी या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली. भारत या स्पर्धेत या विजयासह अजूनही अजिंक्य आहे. टीम इंडियाने विजयासह ११ गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. तर विंडीजचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. विराट कोहलीला सामनावीर घोषित करण्यात आले.

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेणाऱ्या मोहम्मद शमीने या सामन्यातदेखील आपला ठसा उमटवला. मोहम्मद शमीने कालच्या सामन्यात ४ बळी टिपले. त्याने या बरोबरच विश्वचषक स्पर्धेत ३ वेळा ४ बळी टिपण्याचा नवा इतिहास रचला. शमीने २०१५ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत एका सामन्यात ३५ धावा देत ४ बळी टिपले होते. त्यानंतर त्याने गेल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध ४ बळी टिपले आणि त्याने त्याबरोबरच कालच्या सामन्यात देखील ४ बळी टिपण्याची किमया साधली. त्याचबरोबर उमेश यादवनंतर विश्वचषक स्पर्धेत सलग दोन सामन्यात ४ बळी टिपणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.

Leave a Comment