आखाती नव्हे, तर महायुद्धाच्या उंबरठ्यावर अमेरिका-इराण


इराणचा बदला घेण्यासाठी अमेरिका तीन लक्ष्यांवर हल्ले करू शकली असती, मात्र त्यामुळे 150 जण मरण पावले असते. त्यामुळे अशा हल्ल्यांपूर्वी केवळ 10 मिनिटांपूर्वी हल्ल्याचा आदेश रद्द केला, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे इराणसह संपूर्ण जगाची पाचावर धारण बसली आहे. अमेरिका 28 वर्षांनी पुन्हा आखाती युद्ध करणार का, असा प्रश्न सगळया जगाला पडला आहे.

इराणच्या हवाई हद्दीत अमेरिकेचे एक ड्रोन विमान (मानवरहित विमान) हाणून पाडण्यात आले. इराणच्या हवाई संरक्षण दलाने दक्षिण इराणच्या किनाऱ्याजवळ “ग्लोबल हॅाक” या अमेरिकेच्या हेरगिरी विमानाला लक्ष्य केले होते. या विमानाने इराणच्या हुरमुजगान प्रांतात इराणच्या हवाई सीमेचा भंग केला, असा दावा इराणने केला होता. हे ग्लोबल हॉक नावाचे ड्रोन विमान अत्याधुनिक असून खूप महाग आहे. त्याचा बदला म्हणून ही कारवाई होणार होती. ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री या हल्ल्याचा आदेश दिला होता. मात्र एका ड्रोन विमानाला पाडण्यामुळे अशा प्रकारचा हल्ला करून शेकडो लोकांच्या जीवाला इजा करणे आपल्याला मान्य नव्हते, त्यामुळे हा आदेश रद्द केल्याचा दावा ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे ट्विटरवरून केला आहे.

इस्लामी गणतंत्र इराणचे सर्वोच्च नेते आणि इस्लामी क्रांतीचे ज्येष्ठ नेते आयतुल्लाहिल उज्मा सैयद अली ख़ामेनी यांनी इराणला कोणाशीही युद्ध नको आहे. मात्र आम्ही पूर्ण क्षमतेने आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करू, असे वारंवार म्हटले आहे.

मात्र यामुळे आखाती प्रदेश युद्धाच्या काठावर उभा असल्याचा पुन्हा सिद्ध झाले आहे. अमेरिकेने इराणच्या दिशेने एक गोळी झाडली तरी ते नरकाची दारे उघडल्यासारखे होईल, असे जॉर्ज गॅलवे या स्कॉटीश नेत्याने म्हटले आहे. गॅलवे यांनी 2005 साली अमेरिकेच्या विरुद्ध अमेरिकी संसदेत साक्ष दिली होती आणि अमेरिकेचे वाभाडे काढले होते. त्यामुळे त्यांनी दिलेल्या या इशाऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. इराणविरुद्ध उचललेले एक पाऊल हे तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरेल आणि अमेरिकी लोकांना त्याचा भयंकर पश्चात्ताप होईल, असे ते म्हणाले.

ओमानच्या खाडीत दोन आठवड्यांपूर्वी दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला झाला. तेव्हा त्या हल्ल्यासाठी अमेरिकेने इराणलाच जबाबदार धरले होते.
अमेरिकेने आखाती प्रदेशात आपली सेना तैनात करून आणि इराणवर आर्थिक निर्बंध लादून इराणची कोंडी केली आहे. त्यामुळे इराणवर अमेरिकेचा जास्तीत जास्त दबाव आला आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात तिथे मोठ्या प्रमाणात तणाव वाढला आहे. तसेच जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

दोन्हींपैकी कोणत्याही एका बाजूने थोडी जरी आगळीक झाली तर युद्धाला तोंड फुटेल, अशी परिस्थिती आहे. म्हणूनच सगळे जग या संघर्षाकडे श्वास रोखून पाहत आहे. युरोपीय महासंघाने अमेरिका आणि इराण दोघांनीही संयम बाळगावा, असे आवाहन केले. तर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या मते, आता आखातात कोणताही मोठा संघर्ष झेलण्याची जगात क्षमता नाही.

याचे कारण म्हणजे असे युद्ध झालेच तर ते केवळ आखाती युद्ध नसेल. इराणमधील इस्लामी क्रांतीला 40 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मे महिन्यात बैरुत येथे एक मोठी सभा झाली. त्यावेळी हिज्बुल्लाह नेत्यांनी जाहीर केले, की अमेरिकेशी लढाई झाली तर इराण एकटा नसेल. इराणने गेल्या एक दशकात इराणने लेबनॉनपासून सीरिया, इराक, येमेन आणि गाजा पट्टीपर्यंत आपले समर्थक निर्माण केले आहेत. तसेच हिज्बुल्लाह संघटनेचा वापरही इराणने आपल्या शत्रूंशी लढण्यासाठी केला आहे.

अमेरिकेने 1991 मध्ये इराकवर आक्रमण करून पहिले आखाती युद्ध केले. त्यावेळी निमित्त झाले होते ते इराकने कुवैतवर केलेल्या आक्रमणाचे. पहिले आखाती युद्ध हे नव्या जागतिक रचनेचे चिन्ह होते. त्यानंतर 13 वर्षांनी अमेरिकेने पुन्हा इराकवर हल्ला करून दुसरे आखाती युद्ध केले. यावेळी निमित्त झाले ते इराककडे महासंहारक अस्त्र असल्याचे. आता अमेरिका आणि इराण हे तिसऱ्या आखाती युद्धाच्या कड्यावर उभे आहेत. कडेलोट केव्हाही होईल अशी परिस्थिती आहे. यावेळी इराणच्या कारवाया हे त्याला निमित्त होऊ शकते. ट्रम्प यांचा बिनधास्त स्वभाव पाहता ही शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment