कोल्हापुरी चप्पलीचा जीआय टॅग – अजून बरीच मजल बाकी आहे!


कोल्हापुरी चप्पलीबाबत ऐकले नाही अशी एखादीच व्यक्ती महाराष्ट्रात असेल. अगदी हिंदी चित्रपटांमध्येही कोल्हापुरी चप्पलींना वाव मिळाला असून बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या ‘सुहाग’ चित्रपटात या चपलेला एक खास स्थान आहे. आपल्या ढंगदार रंगरूपासाठी ओळखली जाणारी ही चप्पल आता कोल्हापूरच्या ग्रामीण भागांतून थेट जागतिक पटलावर पोचली आहे. कोल्हापुरी चपलेला भौगोलिक संकेतक (जीआई) टॅग मिळाला आहे. मात्र यात थोडी खुशी आणि थोडा गम असाच प्रकार आहे. कारण कोल्हापूरला हा मान कर्नाटकसोबत वाटून घ्यावा लागणार आहे.

नवी दिल्‍ली येथील पेटंट, डिझाईल आणि ट्रेडमार्क महासंचालकांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या विशिष्ट भागात बनणाऱ्या या चपलांसाठी जीआय टॅग देण्यास परवानगी दिली आहे. या अंतर्गत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 4-4 जिल्ह्यांना कोल्हापुरी चप्पल बनविण्यासाठी मुख्य भाग म्हणून मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा तर कर्नाटकातील धारवाड, बेळगाव, बागलकोट आणि बिजापूर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या टॅगचा अर्थ असा, की केवळ या आठ जिल्ह्यांमध्ये बनलेल्या चपला याच कोल्हापुरी चपला म्हणून ओळखल्या जातील. मात्र त्यामुळे कोणालाही समाधान होणार नाही.

वास्तविक कोल्हापुरी चप्पल हा महाराष्ट्राचा मानबिंदू. मात्र कर्नाटकाने या चपलांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात आघाडी घेतली आहे. शिवाय कर्नाटकातील पाठोपाठच्या सरकारांनी याबाबत आक्रमकपणे नवी दिल्लीत आपली बाजू मांडली. बेळगांव, धारवाड, बागलकोट व विजापूर या चार जिल्ह्यांत कोल्हापुरी चपला बनत असल्याचा प्रस्ताव कर्नाटकाने यापूर्वी सादर केला होता. त्यावर गेली 25 वर्षे वाद चालू होता. आपली बाजू मांडण्यात महाराष्ट्रातील सर्वच सरकारे कमी पडली, हे वास्तव आहे. त्याची अखेर अशा रीतीने दोन्ही राज्यांमध्ये समसमान वाटणी करून झाली आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या चार जिल्ह्यांना यात वाटा मिळाला आहे.

आधी महाराष्ट्राने कोल्हापुरी चपलांचे पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.मात्र सीमावादाप्रमाणेच याही बाबत कर्नाटकाने स्पर्धा केल्यामुळे ते प्रकरण रेंगाळले. त्यामुळे जीआयसाठीच्या या भांडणावर उपाय म्हणून दोन्ही राज्यांनी संयुक्त जीआय ( जिऑग्रफिकल इंडिकेशन) प्रस्ताव दाखल केला. दरम्यान, या चपलांची लोकप्रियता वाढतच होती आणि आठ देशांमधून कोल्हापुरी चपलांना मागणी होती. मात्र चपलेचे पेटंट नसल्यामुळे बनावट कोल्हापुरी चपला बनविणाऱ्यांना मोकळे रान मिळाले होते. ते आजतागायत मिळत आहे.

कोल्हापुरी चपल म्हणजे अपवादात्मक व आकर्षक बांधणी असणारी चप्पल. सुबकता आणि टिकावूपणा या दोन गोष्टींमुळे या चपला जगप्रसिध्द झाल्या. या चपला 100 टक्के गायीच्या व बैलांच्या चमड्यापासून केली जाते.कोल्हापुरी चपला या तशा शेकडो वर्षे जुन्या, परंतु ब्रँड म्हणून त्यांची सुरूवात ही 20व्या शतकात झाली. त्यावेळी कोल्हापुरात पादत्राणांचा व्यापार सुरू झाला. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी अनेक उद्योगांना प्रोत्साहन दिले, त्यातच कोल्हापुरी चपलेचे उत्पादनही सामील होते. त्यांच्या कार्यकाळात 20 टॅनिंग सेंटर (चमडा कमावण्याचे केंद्र) स्थापन झाले. त्यामुळे या चपलांवर कोल्हापूरचा खास हक्क आहे.

अन् म्हणूनच महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या कारागिरांमध्ये याबाबत वाद आहे. कोल्हापुरी चप्पल ही फक्‍त कोल्हापुरात तयार होते त्यामुळे कोल्हापूराबाहेर कुठेही तयार झालेल्या चपलेला हा मान देणे चुकीचे आहे. ‘कोल्हापुरी चप्पल’ या नावातच कोल्हापुरी आहे त्यामुळे त्या चपलेवर कोल्हापूरचा निर्विवाद हक्‍क आहे, असे स्थानिक कारागिरांचे म्हणणे आहे. त्यात तथ्य आहे.

मुळात जीआय टॅगचा अर्थच तो आहे. उदाहरणार्थ, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, कांजीवरम साडी, दार्जिलिंग चहा आणि तिरुपती मंदिरातील लाडू इ. देशातील 325 उत्पादनांना आजपर्यंत भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे, यामध्ये महाराष्ट्रातील 31 उत्पादनांचा समावेश आहे. यात सोलापुरी चादर, सोलापुरी टॉवेल, उपडा जमदानी साडी, पुणेरी पगडी, पैठणी साडी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नासिकची द्राक्षे, वारली पेंटींग, कोल्हापूरी गुळ, आजरा घनसाळ तांदुळ, वायगाव हळद, मंगळवेढा ज्वारी, भीवापूर मिरची, सिंधुदुर्ग व रत्नागिरी कोकम, वाघ्या घेवडा, नवापूर तुरडाळ, आंबेमोहर तांदूळ, वेंर्गुला काजू, सांगली मनुका, लासलगाव कांदा, डहाणु घोळवड चिक्कु, बीडचे सिताफळ, जालन्याचे गोड संत्री, जळगावची केळी, मराठवाड्याचे केसर आंबे, पुरंदरचे अंजीर, जळगावचे वांग्याचे भरीत, सोलापूरचे डाळिंब, नागपूरची संत्री, करवत काटी साडी आणि कोकणचा हापूस आंबा यांचा समावेश आहे.

या उत्पादनांना जीआय टॅग मिळाला आहे तो तेथील स्थानिक परंपरा व वैशिष्ट्यांमुळे. तीच पद्धत कोल्हापुरी चपलेबाबतही पाळली गेली पाहिजे. आज कोल्हापुरी चपलीला जीआय टॅग मिळून तिला काही एक मान्यता मिळाली असली तरी हे अर्धेमुर्धे यश आहे. लढाई फक्त अर्धी जिंकली आहे. कोल्हापूरला त्याचा हक्क व मान संपूर्णपण मिळाला पाहिजे. आज आधुनिकतेच्या वेढ्यात काहीशा मागे पडलेल्या या चपलेला अजून बरीच मजल मारावी लागणार आहे!

Leave a Comment