‘हेल्थ इन्श्युरन्स’ खरेदी करताना…


एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत उद्भवणारे गंभीर विकार, तर कधी अचानक उद्भवलेल्या व्याधीमुळे कराव्या लागणाऱ्या तातडीच्या शस्त्रक्रिया, व त्यानंतरच्या उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये करावे लागणारे काही दिवसांचे वास्तव्य यांचा एकूण खर्च बराच मोठा असतो. अशा प्रकारे अचानक उद्भवलेल्या या खर्चाचा भार हलका होण्याच्या उद्देशाने वर्षाला ठराविक ‘प्रीमियम’ भरून हेल्थ इन्श्युरन्स, म्हणजेच आरोग्य विमा करवून घेण्याचा पर्याय लोक स्वीकारत आहेत. आरोग्य विमा घेण्याचा निर्णय फायद्याचा असला, तरी हा विमा घेताना काही गोष्टींचा नीट विचार करून मगच कशा प्रकारचा आरोग्य विमा घेतला जावा याचा निर्णय घेणे इष्ट ठरते.

कोणत्याही प्रकारचा विमा उतरविण्यासाठी त्या विमा योजनेच्या अनुसार पॉलिसीधारकाला दर वर्षी एक ठराविक रक्कम ‘प्रीमियम’ म्हणून भरावी लागते. आरोग्य विम्यासाठी देखील अशाच प्रकारे दर वर्षी प्रीमियम भरावे लागते. अनेक लोक सर्वात कमी प्रीमियम असलेल्या आरोग्य विमा योजनेची निवड करतात. पण यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी, की प्रीमियम किती आहे हे पाहून आरोग्य विमा योजना निवडली जाण्याच्या ऐवजी या विमा योजनेअंतर्गत कोणकोणते लाभ पॉलिसीधारकाला मिळणार आहेत, हे पाहणे अधिक महत्वाचे आहे. अनेकदा कमी प्रीमियम भरावे लागणार म्हणून निवडलेली विमा योजना, केवळ प्राथमिक आर्थिक सुरक्षा प्रदान करणारी ठरते, आणि बहुतेकवेळी उपचारांचा खर्च, विम्यातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा अधिक होतो.

आपल्यासाठी योग्य आरोग्य विमा योजना कोणती याचा निर्णय घेण्यासाठी विमा एजंटचा सल्ला घेणे उपयुक्त ठरत असले, तरी केवळ एजंटच्या सल्ल्यावर विसंबून न राहता, उपलब्ध असलेल्या प्रत्येक आरोग्य विमा योजनांचे लाभ, त्यांचे प्रीमियम, याबद्दल सविस्तर माहिती ऑनलाईनही उपलब्ध असते. या माहितीचा सविस्तर अभ्यास करून आणि एजंटने दिलेला सल्ला विचारात घेऊन आपल्या दृष्टीने कोणती आरोग्य विमा योजना योग्य ठरेल याचा निर्णय घेणे आवश्यक आहे.

अनेकदा आरोग्य विमा योजना घेताना पॉलिसीधारक आपल्याला आधीपासूनच असलेल्या लहान-मोठ्या व्याधींची सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ करतात. विमा उतरविण्याच्या आधीपासूनच एखादी व्याधी असल्याची माहिती दिल्यास अधिक प्रीमियम भरावे लागेल, किंवा विमा उतरविता येणार नाही या भीतीपायी ही माहिती देण्याचे टाळले जाते. मात्र असे करणे हे पॉलिसीधारकाच्या दृष्टीनेच अधिक नुकसानकारक ठरू शकते. विमा उतविल्यानंतर कधी आजारपणामुळे विम्याची रक्कम ‘क्लेम’ करण्याची वेळ आली, आणि त्यावेळी पॉलिसीधारकाने आपल्याला आधीपासूनच असलेल्या व्याधींची माहिती दिली नसल्याचे उघड झाले, तर विम्याची क्लेम केलेली रक्कम विमा कंपनीकरून रद्द करण्यात येऊ शकते. त्यामुळे विमा योजना घेताना आपल्याला असलेल्या सर्व व्याधींविषयी सविस्तर आणि योग्य माहिती रिपोर्ट्सच्या सह विमा कंपनीला देणे आवश्यक आहे.

आरोग्य विमा योजनेची निवड करताना त्या योजनेअंतर्गत ‘अॅड ऑन’ सुविधा समाविष्ट असतील याची खात्री करून घ्यावी. या योजनांचे प्रीमियम थोडे जास्त भरावे लागत असले, तरी आजारपणामध्ये हॉस्पिटलमधील वास्तव्यादरम्यान झालेले सर्व खर्च या योजनेअंतर्गत विम्याद्वारे ‘क्लेम’ करत येऊ शकतात. आरोग्य विमा योजनेची निवड करण्यापूर्वी त्या योजनेअंतर्गत कोणकोणत्या प्रकारचे लाभ विमाधारकाला घेता येणार आहेत याची सविस्तर माहिती दिलेली असते. तसेच या योजनेअंतर्गत कोणते खर्च विम्याच्या रकमेमध्ये समाविष्ट करता येणार आणि कोणते खर्च समाविष्ट करता येणार नाहीत याचीही सविस्तर यादी माहितीपत्रकामध्ये दिलेली असते. ही माहिती व्यवस्थित वाचून त्यानंतरच आपल्या दृष्टीने सोयीच्या आरोग्य विमा योजनेची निवड करावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment