देशाच्या हितासाठी शरद पवारांनी एनडीएसोबत यावे – आठवले


कोल्हापूर – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत यावे, असा सल्ला दिला आहे. रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी बोलताना राहुल गांधी, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर आपल्या खास शैलीत टीका केली.

ते यावेळी बोलताना म्हणाले, उलट-सुलट बोलून राहुल गांधी यांनी मते घालवल्यामुळे आता त्यांना तोंड दाखवायला देखील जागा राहिली नाही. वंचितांना सत्तेत आणायचे असल्यास प्रकाश आंबेडकरांनीही एनडीएमध्ये यावे. वंचितांना सत्तेपासून प्रकाश आंबेडकर हे दूर ठेवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

देशात लवकर काँग्रेस सत्तेत येईल असे वाटत नसल्यामुळे पवारांनी देशाच्या हितासाठी मोदींना साथ द्यावी, असे आठवले यावेळी म्हणाले. राम मंदिर अयोध्येतच व्हावे, असे माझे मत आहे. पण त्यासाठी मुस्लीमांवर दबाव टाकता कामा नये. शिवाय ते मंदिर अधिकृत असावे, असे राम मंदिराच्या मुद्द्यावर आठवले म्हणाले. विधानसभेच्या २० जागा छोट्या मित्र पक्षांना हव्या आहेत. आठवले गटाला त्यापैकी १२ जागा मिळाव्यात आणि सत्तेत वाटा मिळावा, अशी मागणी आठवलेंनी केली.