जलसमाधी मिळालेल्या ‘टायटॅनिक’च्या दर्शनासाठी पहिला वहिला टुरिस्ट ग्रुप सज्ज


सुमारे एकशे सात वर्षांच्या पूर्वी जलसमाधी मिळालेल्या टायटॅनिक या प्रवासी जहाजाचे अवशेष पाहण्याची संधी आता पर्यटकांना मिळणार असून, प्रशांत महासागराच्या तळाशी, न्यू फाउंडलंडच्या सागरी किनाऱ्यापासून सुमारे चारशे मैलांच्या अंतरावर जहाजाचे हे अवशेष १९८५ साली सापडले होते. यंदाच्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या मोसमामध्ये टायटॅनिकच्या दर्शनार्थ अनेक ट्रिप्स आयोजित करण्यात आल्या असून, समुद्राच्या तळाशी, तेरा हजार फुट खोलीवर असलेले हे अवशेष अगदी जवळून पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.

१९१२ साली आपल्या प्रथम सफरीसाठी इंग्लंडमधील साउथहॅम्पटनहून न्यूयॉर्ककडे निघालेल्या या प्रचंड प्रवासी जहाजाला आपल्या पहिल्याच सफरीच्या दरम्यान एका विशालकाय हिमनगाला धडकल्याने अवघ्या तीन तासांच्या अवधीतच जलसमाधी मिळाली होती. तो दिवस चौदा एप्रिल १९१२ चा होता. जीवरक्षक होड्यांची अपुरी संख्या आणि रेडियो ट्रान्समिशन करण्यात येत असलेल्या अडचणी यांमुळे हे संकट आणखीनच गंभीर होऊन त्यामुळे अनेक प्रवाश्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. या जहाजाला जलसमाधी मिळाल्यानंतर सुमारे सत्तर वर्षांच्या काळानंतर १९८५ साली एका अमेरिकन-फ्रेंच एक्स्पेडीशन टीमला याचे अवशेष शोधण्यात यश आले. समुद्राच्या तळाशी सुमारे तेरा हजार फुटांच्या खोलीवर टायटॅनिकचे दोन मोठे तुकडे या संशोधकांच्या गटाला सापडले. ओशनोग्राफिक जहाज आणि रोबोटिक सबमरीनच्या सहाय्याने हे अवशेष शोधण्यात संशोधकांना यश आले होते.

याच अवशेषांचे दर्शन घेण्याची संधी ‘ओशनगेट’ नामक कंपनी पर्यटकांसाठी उपलब्ध करवून देत असून, सुमारे दहा दिवसांची ही सफर असणार आहे. या सफरीसाठी माणशी १००,००० डॉलर्स खर्च आकारण्यात येणार असून, सुरुवातीला पर्यटकांना टायटॅनिकचे अवशेष जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. या सफरीची २०१९ सालची बुकिंग्ज आधीच संपली असून, आता २०२० साली आयोजित होणाऱ्या सफरींसाठी कंपनीने बुकिंग्ज घेण्यास सुरुवात केली असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. या सफरींमध्ये समाविष्ट होणारे पर्यटक पंचवीस ते सत्तर या वयोगटातील असून, सर्वांनाच टायटॅनिक चे अवशेष पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली असल्याचे समजते. या सफरी जून ते ऑगस्ट या काळादरम्यान आयोजित केल्या जाणार आहेत.

Leave a Comment