या इस्पितळामध्ये रोगाचे निदान करण्यापूर्वी पाहिली जाते रुग्णाची पत्रिका !


आजच्या विज्ञानाच्या युगामध्ये ज्योतिष शास्त्र, तंत्र मंत्र, भूत प्रेत अशा गोष्टींवर अनेकांचा अजिबात विश्वास नसतो. विशेषतः विज्ञान किंवा वैद्यकशास्त्र या क्षेत्रांशी संबंधित तज्ञ मंडळींच्या मतानुसार प्रत्येक घटना ही कार्यकारणभावाने घडत असल्याने ती घटना घडण्यामागे कोणते ना कोणते शास्त्रीय कारण अवश्य असते. त्यामुळे घडणाऱ्या घटना आणि ज्योतिष शास्त्र, तंत्र मंत्र किंवा भूत प्रेत यांच्याशी जोडलेला संबंध या व्यक्तींना अजिबात पटत नाही. मात्र भारतामध्ये राजस्थान राज्यातील जयपूर शहरात एक असे वैद्यकीय इस्पितळ आहे, जिथे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जाण्यापूर्वी त्यांची पत्रिका पहिली जाते !

‘युनिक संगीता मेमोरियल हॉस्पिटल’ असे भारदस्त नाव असलेल्या या इस्पितळामध्ये रुग्णांच्या उपचारासाठी सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध असल्या तरी रुग्णाला इस्पितळामध्ये भर्ती केले जाण्यापूर्वी त्याची पत्रिका पाहिली जाते. या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये या रुग्णालयाचे उद्घाटन झाले असून, येथे औषधांच्या काऊंटर सोबतच एक खास ‘ज्योतिष काऊंटर’ही सुरु करण्यात आला आहे. तसेच या इस्पितळामध्ये अॅलोपथी सोबत रुग्णांसाठी आयुर्वेद, योगशास्त्र, याही पर्यायी उपचारपद्धती उपलब्ध करवून देण्यात आल्या आहेत.

येथे येणाऱ्या रुग्णांची पत्रिका पाहून त्यांनंतर त्यांच्या रोगाचे निदान केले जाते आणि त्यानुसार उपचारपद्धती अवलंबण्यात येते. यामुळे रुग्णही समाधानी होत असल्याचे इस्पितळाच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

Leave a Comment