प्रचारादराम्यान दुकानदाराच्या प्रश्नामुळे अनुपम खेर यांची झाली फजिती


चंदीगड : अभिनेते अनुपम खेर यांची पत्नी आणि भाजप उमेदवार किरण खेर यांच्या प्रचारादरम्यान चांगलीच फजिती झाली. भाजपचा 2014 चा जाहीरनामा दाखवत अनुपम खेर यांना मागील आश्वासनांबद्दल चंदीगडमध्ये प्रचारादरम्यान एका दुकानदाराने विचारले. पण यावर अनुपम खेर काहीही न बोलता हात जोडून तिथून निघून गेले.

भाजपच्या तिकीटावर किरण खेर चंदीगडमध्ये निवडणूक लढवत आहेत. सध्या मोठ्या जोशामध्ये त्यांचे पती आणि अभिनेते अनुपम खेर त्यांचा प्रचार करत आहेत. अनुपम खेर चंदीगडमध्ये प्रचारासाठी काही कार्यकर्त्यांसह एका दुकानात पोहोचले. पण अनुपम खेर दुकानदाराच्या प्रतिक्रियेमुळे काहीसे गोंधळले. भाजपचा मागील लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा दुकानदाराच्या हातात होता. त्याने जाहीरनामा दाखवत विचारले की, तुम्ही काही आश्वासने मागील निवडणुकीत दिली होती, यापैकी तुम्ही काय केले आहे? असे विचारले

पण अनुपम खेर यांना यावेळी कोणतेही उत्तर देता आले नाही आणि तिथून हात जोडून ते निघून गेले. सोशल मीडियावर अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लोक वेगवेगळ्या कमेंट्स करुन शेअर करत आहेत.


अनुपम खेर यांनीही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपल्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले की, विरोधकांनी काल किरण खेर यांच्या प्रचारादरम्यान दोन जणांना एका दुकानात ठेवले होते, भाजपच्या 2014 मधील जाहीरनाम्यावर मला प्रश्न विचारण्यासाठी. मागे उभा असलेला माणूस व्हिडीओ बनवत असल्याचे पाहून मी तिथून निघालो. आज त्यांनी व्हिडीओ जारी केला. दाढीवाल्याचे कृत्य पाहा.


अनुपम खेर यांची फजिती होण्याची ही पहिली घटना नाही. याआधी अनुपम खेर सोमवारी (6 मे) एका सभेला संबोधित करणार होते. पण त्यांनी सभा गर्दी नसल्याने रद्द केली आणि दुसऱ्या सभेत गेले. स्थानिक वृत्तपत्रांनी याचे फोटो शेअर केले होते. खेर यांनी यानंतर मंगळवारी (7 मे) काही वृत्तपत्रांची कात्रणे पोस्ट करुन वृत्तपत्रांच्या दाव्यावर टीका केली. त्यांनी लिहिले आहे की, पहिला फोटो अगदी खरा आहे. सभास्थळी वेळेच्या आधी मी पोहोचलो होतो आणि तिथे कोणीही नव्हते. मी त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी गेलो. पण दुसऱ्या सभेचा फोटो सत्य सांगत आहे. संबंधित वृत्तपत्र उद्याच्या अंकात हा फोटो शेअर करणार का?

Leave a Comment