दुर्गेच्या नऊ रूपांशी निगडित नऊ औषधी

herab
भारतीय धर्मशास्त्रांमध्ये हिंदू वर्षात दोन वेळा नवरात्री उत्सव साजरा केला जाण्याची परंपरा आहे. यामध्ये वासंतीय नवरात्र, म्हणजेच चैत्र नवरात्र हे नवजीवनाचे प्रतीक आहे. याच दिवसांमध्ये अशा अनेक औषधी अंकुरित होतात ज्या मनुष्याच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत. या औषधी वसंत ऋतूमध्ये अंकुरित होऊन शरद ऋतूमध्ये उपयोगात आणण्यास तयार होतात. त्यामुळ वासंतिक नवरात्र आणि शारदीय नवरात्र हे दोन्ही उत्सव आपापल्या परीने महत्वाचे आहेत. हिंदू धर्मशास्त्रांच्या मान्यतेनुसार वसंत ऋतू जीवनाच्या आरंभाचे प्रतीक आहे. या दिवसांमध्ये दिवस आणि रात्रीचा अवधी एकसमान असतो, तसेच ऋतुमान बदलत असल्याने या दिवसांत रोगराई जास्त पसरत असते. म्हणूनच सर्व प्रकारच्या रोगांना दूर ठेवण्यासाठी देवीच्या ‘आद्य शक्ती स्वरूप’ची पूजा वासंतिक नवरात्रामध्ये केली जाण्याचे विधान शास्त्रांमध्ये आहे.
herab1
देवीच्या पूजनासोबतच देवीरूपी नऊ औषधींची पूजा केली जाण्याचा प्रघातही अनेक ठिकाणी आहे. या सर्व औषधी शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या निरनिराळ्या व्याधींवर उपयुक्त आहेत. ‘शैलपुत्री’ या देवीच्या रूपाचे प्रतीक ‘पाषाणभेद’ ही औषधी आहे. ही औषधी स्त्रियांच्या मासिक पाळीशी निगडीत समस्यांवर उपयुक्त आहे. तसेच एखादी जखम झाली असल्यास किंवा शरीरावर कुठे सूज आली असल्यास या औषधीचा लेप उपयुक्त ठरतो. किडनी स्टोन, आणि कफावरही ही औषधी उपयुक्त आहे. देवीच्या ‘ब्रह्मचारिणी’ या रूपाचे प्रतीक ‘ब्राह्मी’ ही औषधी आहे. मेंदू शांत ठेवणारी आणि बुद्धी वृद्धी करणारी अशी ही औषधी आहे.
herab2
‘चंद्रघंटा’ या देवीच्या रूपाचे प्रतीक असलेली ‘चंद्रसूर’ नामक औषधी सर्व प्रकारच्या ज्वरांचा नाश करणारी आहे, तर देवीच्या ‘कुष्मांडा’ या रूपाचे प्रतीक असलेली कुष्मांड ही औषधी आमाशय आणि पोटाशी निगडित विकार दूर करणारी आहे. ‘स्कंधमाते’चे प्रतीक असलेली औषधी तुळस असून यामध्ये अनेक जीवनसत्वे आहेत. तुळस उत्तम रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारी आहे. सर्दी, खोकला, दमा, फुफ्फुसाचे रोग, या सर्व विकारांवर तुळस गुणकारी आहे. तुळस जैविक संक्रमणे रोखणारी, वेदनाशामक आणि पाणी शुद्ध करणारीही आहे.
herab3
देवीच्या ‘कात्यायनी’ या रूपाचे प्रतीक नागरमोथा ही औषधी आहे. यालाच लव्हाळे असे ही म्हणतात. याच्या कंदांमधून सुवासिक तैलअर्क निघत असल्याने या औषधीचा वापर सुवासिक तेले, उटणे बनविण्यासाठी होतो. याच्या मुळ्यांची पूड त्वचा विकारांवर गुणकारी असते. मूत्राविकारांवरही नागरमोथा उपयुक्त असतो. ‘कालरात्री’ या दुर्गेच्या रूपाचे प्रतीक ‘सुमेवा’ नामक औषधी आहे. शरीरातील नकारात्मक उर्जा नष्ट करून सकारात्मक उर्जेची वृद्धी करण्यास ही औषधी सहायक असते. ‘सोमवल्ली’ ही औषधी देवीच्या ‘महागौरी’ या रूपाचे प्रतीक असून या औषधीला कंतकारी म्हणूनही ओळखले जाते. ही औषधी मधुमेह, कर्करोग, अल्सर, त्वचा रोग, जीवाणू संक्रमण, पचनाशी निगडित विकार अशा अनेक व्याधींवर उपयुक्त आहे. देवीच्या ‘सिध्दधात्री’ या रूपाचे प्रतीक ‘शंखपुष्पी’ ही औषधी असून, ही औषधी बुद्धीला बल देणारी, स्मृती आणि एकाग्रता वाढविणारी आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment