ब्रजमध्ये तयार केल्या जाणाऱ्या गुलालाने रंगणार देशभरातील होळीचा सण

holi
केवळ देशभरातच नाही, तर जगभरामध्ये होळीच्या खास परंपरांसाठी ओळखळ्या जाणाऱ्या ब्रज, मथुरा प्रांतामध्ये होळीच्या सणाची तयारी आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. मथुरेमध्ये अनेक ठिकाणी अबीर-गुलाल तयार करण्याची कामे सुरु आहेत. मथुरा येथे खास होळीसाठी तयार केल्या जाणाऱ्या गुलालाला देशभरातून मोठी मागणी असते. खास ब्रज येथे दरवर्षी साजऱ्या केल्या लठमार होळीसाठी बरसाना येथील ‘लाडली जी’ या राधेला समर्पित मंदिराचे सेवेदार ‘टेसु’ नामक फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करतात. याच रंगाचा वापर लठमार होळीसाठी केला जातो. ब्रज प्रांतामध्ये होळीचा सण महिनाभर साजरा केला जातो.
holi1
खास होळीच्या सणासाठी मथुरेतील अनेक कारखान्यांमध्ये गुलाल तयार केला जातो. हा गुलाल केवळ देशभरातच नाही, तर विदेशातही निर्यात केला जातो. ब्रज प्रांताचा थेट संबंध श्रीकृष्णांशी असल्याने या गावी तयार होणारा गुलाल पवित्र मानला गेला आहे. म्हणूनच मथुरेमध्ये तयार केल्या जाणाऱ्या गुलालाला होळीनिमित्त मोठी मागणी असते. यासाठी मथुरेच्या जवळ असलेल्या तेहरा गावामध्ये बनविला जाणारा गुलाल सर्वाधिक लोकप्रिय समजला जातो.
holi2
लाडली जी मंदिरामध्ये होळीच्या निमित्ताने ‘टेसु’च्या फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करण्याचे काम मंदिराच्या सेवेकऱ्यांनी सुरु केले असून, ही फुले पाण्यामध्ये उकळून त्यांपासून रंग तयार केला जातो. यासाठी यंदाच्या वर्षी दिल्ली आणि बनारस येथून पाच क्विंटल वाळविलेली फुले मागविण्यात आली असून, होळीसाठी हाथरस येथून दहा क्विंटल गुलालही मागविण्यात आल्याचे समजते.

Leave a Comment