
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप मोठा पक्ष असेलही, मात्र, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असे भाकीत वर्तवले आहे. ज्या राज्यात भाजपची दहा-दहा वर्षे सत्ता होती, त्या ठिकाणी भाजपची सत्ता गेली. देशातही आता देखील तशी परिस्थिती येईल, असेही पवार यावेळी म्हणाले.
आगामी लोकसभेत भाजपच मोठा पक्ष ठरेल, शरद पवारांचे भाकीत
भाजपच्या विरोधात देशातील विरोधी पक्ष एकवटले असून चंद्राबाबू आणि इतर नेत्यांसोबत १४ तारखेला दिल्लीत बैठक होत आहे. देशस्तरावर कसे लढायचे हे या बैठकीत ठरविणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिथे उभे आहेत, त्या ठिकाणी मी स्वत: प्रचार करणार असल्याचेही पवार म्हणाले.
यावेळी पवार यांना राज्यातील आघाडीच्या जागावाटपासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यात एकत्र येऊन काम करत आहे. आम्हाला राज्यात शेकाप मदत करत आहे. पीआरपीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडेही आम्हाला सहकार्य करत आहेत. त्यामुळे आम्ही दोन्ही पक्ष आणि इतर सर्व एकत्रित काम करत आहोत. नुकतीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासोबत माझे बोलणे झाले असून त्यांना आम्ही एक जागा द्यायचे ठरवले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आम्ही कधीही बोललो नाही, शिवाय आम्हाला त्यांच्याशी बोलावसेही वाटले नाही. त्यांच्यात शक्ती असेल तर त्यांनी वेगळे लढावे, असेही ते प्रकाश आंबेडकरांसंदर्भातील आघाडीबाबत बोलताना म्हणाले. राज्यात आता आघाडीचे काम जोरात सुरू असल्याचेही पवार म्हणाले.
आपला हट्ट करून मोदींनी देशात नोटाबंदी केली, हा निर्णय चुकीचा होता. त्याबाबत रिझर्व बँकेचे स्टेटमेंट आले असून त्यात मोदी उघडे पडले आहेत. नोटाबंदीनंतर एक तर लहान उद्योग आणि नोकऱ्या गेल्यामुळे भाजपला येत्या निवडणुकीत यासर्वांची किंमत मोजावी लागेल, असेही पवार यावेळी म्हणाले. राजकीय निर्णयाचा विषय आल्यास मोदी हे कोणाचा सल्ला घेत नाहीत ते आपली ५६ इंच छाती दाखवत असतात. पण आताच्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी हे पंतप्रधान होतील असे मला वाटत नाही. भाजप मोठा पक्ष होईल, मात्र भाजपला सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.
