लोकसभा निवडणुकीतून शरद पवार यांची माघार, पार्थ पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

sharad-pawar
पुणे – माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांना या मतदार संघात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे या संदर्भात आढावा घेण्यासाठी महत्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे.

विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह माढ्यातील राष्ट्रवादीचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीला शेकाप नेते गणपतराव देशमुख, माढा आमदार बबनदादा शिंदे, सोलापूर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार भारत भालके, कल्याण काळे उपस्थित आहेत.

दरम्यान शरद पवार पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्याबाबत म्हणाले, आमच्या कुटुंबीयांमधील सुप्रिया सुळे उमेदवारी करणार आहेत, तर पार्थ पवार यांच्या उमेदवारीसंदर्भात शेकापचे जयंत पाटील यांनी त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवाराला संधी द्यावी, असा विचार आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणूक न लढता नव्या पिढीला पार्थला उमेदवारी देण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत.

तसेच, आम्ही उमेदवारीचा निर्णय लोकमान्यता आणि निवडणूक येण्याची क्षमता या निकषांवर घेतो, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांची उमेदवारी अप्रत्यक्षरित्या जाहीरच करुन टाकली. मावळमधून पार्थ पवार हे लढल्यास लढत एकतर्फी होईल. शिवाय, पार्थ पवार हे समर्थ उमेदवार असल्यामुळे त्यांना शेकापच्या सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे, असे जयंत पाटील म्हणाले. मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि रायगडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघांचा मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ बनला आहे.

Leave a Comment