इसिस आता सीरियामध्ये केवळ 1.5 स्क्वेअर मैलांपुरती!

isisi
आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसची कंबर मोडण्यात आली असून ही संघटना शेवटच्या घटका मोजत आहे. आता ही संघटना केवळ 1.5 स्क्वेअर मैलांपुरती उरली आहे, असा दावा सीरियाच्या सैन्याने केला आहे.

पश्चिम सीरियापासून बगदादच्या सीमेपर्यंत पसरलेल्या इसिसचे प्रभावक्षेत्र आता केवळ चार चौरस किलोमीटर एवढे राहिले आहे, असे सीरियन डेमोक्रेटिक फोर्सच्या (एसडीएफ) एका वरिष्ठ कमांडरने सीएनएन वाहिनीला सांगितले.

“तोफखाना आणि विमानाच्या मदतीने आम्ही या ठिकाणी नियंत्रण मिळवू शकलो आहोत. ईश्वराची इच्छा असेल तर दहा दिवसांत आम्ही हे काम पूर्ण करू शकू,” असे एसडीएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

डिसेंबरपासून बहुतांश महिला, मुले व वृद्धांनी इसिसचे नियंत्रण असलेल्या सुसा, मारिशिदा आणि सीरियामधील इतर शहरांमधून पळ काढला आहे. मात्र इसिसच्या ताब्यात असलेल्या गावांमध्ये अद्याप हजारो लोक राहतात.

इसिसचा नेता अबू बकर अल-बगदादी याने आठ वर्षांपूर्वी स्वतःला खलिफा जाहीर करून इसिसची खिलाफत स्थापन केली होती. सीरियात इसिसचा पराभव होत असला तरी नायजेरिया, लिबिया, अफगाणिस्तान आणि फिलीपाईन्स अशा देशांमध्ये संघटनेचा विस्तार होत आहे, असे संरक्षण तज्ञाचे मत आहे.

Leave a Comment