जपानमध्ये सध्या सर्वाधिक भेडसावणारी समस्या – ‘कारोशी’

Karoshi
‘कारोशी’ या सामाजिक समस्येने जपानमधील बहुतेक कर्मचारी जनता ग्रस्त आहे. अतिकाम करून त्यामुळे आलेल्या शारीरिक आणि मानसिक तणावामुळे स्वतःचे जीवित धोक्यात घालण्याला जपानमध्ये ‘कारोशी’ म्हटले जाते. जपानी लोक कामाच्या बाबतीत अतिशय चोखंदळ समजले जातात. तसेच जपानमध्ये जरासुद्धा विश्रांती न घेता अनेक तास सातत्याने काम करीत राहण्याची पद्धत रूढ आहे. म्हणूनच या प्रगत देशामध्ये संपन्नता असून ही लोकांना मानसिक स्वास्थ्य नाही. मानसिक तणाव सहन न होऊन अनेकांनी आपले प्राणही गमाविल्याच्या घटना या देशामध्ये वेळोवेळी घडत असलेल्या ऐकावयास मिळत असतात.
Karoshi1
लोकांच्या मनावरील कामाचा किंवा इतर व्यक्तिगत कारणांस्तव आलेल्या तणावाला वाट मोकळी करून देण्यासाठी आता अनके कंपन्यांमध्ये ‘नामिदा सेन्सेई’, म्हणजेच अश्रूंवाटे मानसिक तणावाला वाट मोकळी कशी करून दिली जावी हे शिकविणारे स्वयंसेवक पहावयास मिळत आहे. कामाचा, येथील जीवनशैलीचा तणाव केवळ कर्मचाऱ्यांवरच नाही, तर अगदी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावरही पडत आहे. त्यामुळे ‘नामिदा सेन्सेई’ आता शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करीत आहेत. मनसोक्त रडल्यामुळे मनावरील तणावाला वाट कशी मोकळी करून देता येते हे समजाविण्याचे काम हे नामिदा सेन्सेई करीत असतात.
Karoshi2
जपानमध्ये सुमारे वीस टक्के कर्मचारी आठवड्याला ऐंशी तासांपेक्षा अधिक काळ काम करीत असतात. सतत वाढत जाणाऱ्या कामाचा ताण सहन होऊ न शकल्याने, व मनावरील ताण हलका करण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय न सापडल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडल्याच्या अनेक घटना जपानमध्ये घडत आहेत. रडल्यामुळे मनावरील ताण कमी होत असल्याचे मानसशास्त्राने सिद्ध केले असून, जपानमधील शाळांमध्ये देखील आठवड्यातून एकदा मुलांना मनसोक्त रडण्याची परवानगी दिली जात असते. तर मोठ्यांनी अतिशय भावनाप्रधान पुस्तके वाचून, किंवा चित्रपट पाहून अश्रूंना वाट करून देण्याची शिकवण सध्या जपानमध्ये दिली जात आहे.