कोण होत्या मादाम तुसाद?

madam
लंडन येथील मादाम तुसाद वॅक्स म्युझियम जगभरामध्ये प्रसिद्ध असून, या ठिकाणी जगभरातील अनेक नामवंत व्यक्तींचे मेणाचे पुतळे पहायास मिळतात. मादाम तुसाद वॅक्स म्युझियम आता लंडन सोबतच जगातील अनेक मोठ्या शहरांमध्ये आहेत. भारतातील अनेक नामवंत कलाकारांचे पुतळेही मादाम तुसाद वॅक्स म्युझियम येथे आहेत. या संग्रहालयामध्ये आपला मेणाचा पुतळा बनणे हे मानाचे प्रतीक समजले जाते. या संग्रहालयामध्ये आजवर अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित, इत्यादी नामवंत भारतीय कलाकारांचे मेणाचे पुतळे प्रदर्शित करण्यात आले आहेत. हे म्युझियम ज्यांच्या नावाने सुरु झाले या मादाम तुसाद कोण होत्या, हे जाणून घेऊ या.
madam1
अॅना मारिया ग्रोशोल्त्झ तुसाद या फ्रेंच असून, यांचा जन्म १७६१ साली फ्रांसमध्ये झाला असून, मेणाचे पुतळे बनविणाऱ्या त्या सुप्रसिद्ध शिल्पकार आणि मादाम तुसाद वॅक्स म्युझियमच्या संस्थापक म्हणून त्यांची ओळख होती. अॅना मारिया यांच्या जन्मानंतर अवघ्या दोनच महिन्यामध्ये त्यांचे वडील युद्धामध्ये कामी आले. त्यानंतर त्यांची आई अॅन त्यांना घेऊन स्वित्झर्लंडमधील बर्न शहरामध्ये आली, आणि फिलीप कर्टीयस नामक एका डॉक्टरच्या घरी ‘हाऊसकीपर’ म्हणून राहिली. फिलीप यांना मेणाचे पुतळे बनविण्याची आवड होती आणि त्यामध्ये ते पारंगतही होते. कालांतराने फिलीप पॅरीसमध्ये राहण्यास गेले आणि तेथे त्यांनी मेणाचे पुतळे बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी बनविलेला, फ्रान्सचे राजे लुई (सोळावे) यांच्या दासीचा मेणाचा पुतळा आजही मादाम तुसाद संग्रहालयामध्ये पहावयास मिळतो.
madam2
फिलीप यांनी मेणाचे पुतळे बनविण्याची कला मादाम तुसाद यांना शिकविली आणि त्यांनी ती लवकरच आत्मसातही केली. १७७७ साली मादाम तुसाद यांनी पहिला मेणाचा पुतळा तयार केला. या पुतळा सुप्रसिद्ध फ्रेंच लेखक ‘वोल्टेअर’ चा होता. त्यानंतरच्या काळामध्ये मादाम तुसाद यांनी अनेक नामवंत लोकांचे मेणाचे पुतळे तयार केले. हेच पुतळे प्रदर्शित करण्यासाठी त्यांनी मादाम तुसाद वॅक्स म्युझियमची स्थापना केली. आजच्या काळामध्ये हे संग्रहालय जगभरातील अनेक देशांमध्ये असून, या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पहावयास मिळत असते.

Leave a Comment