भारतातील ‘प्राग’ – मुन्सियारी

Munasari
उत्तराखंड मधील हिमालय पर्वतराजीमधील पंचचुली पर्वतांच्या कुशीमध्ये वसलेल्या मुन्सियारी गावाला ‘लिटल काश्मीर’ म्हणूनही ओळखले जाते, तर कोणी याची तुलना युरोपमधील, निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या नयनरम्य ‘प्राग’ शहराशी करतात. हिवाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणवर बर्फवृष्टी होत असते. मुन्सियारी या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या उन्हाळ्यामध्ये जास्त असली, तरी ज्यांना बर्फाच्छादित डोंगरांवर ट्रेकिंग करण्याचा अनुभव घ्यायचा आहे, असे हौशी पर्यटक हिवाळ्यातही मुन्सियारीला भेट देत असतात.
Munasari1
समुद्रसपाटीपासून २२०० मीटरच्या उंचीवर असलेल्या या लहानश्या गावाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. हे लहानसे गाव राजधानी दिल्ली पासून सुमारे सहाशे किलोमीटर अंतरावर आहे.
Munasari2
मुन्सियारी गावाला येण्यासाठी पर्यटकांना येथील सर्वात जवळच्या, काठगोदाम रेल्वे स्टेशनवर उतरावे लागते. काठगोदाम पासून मुन्सियारी गाव साधारण २९५ किलोमीटरच्या अंतरावर आहे. काठगोदाम पासून खासगी टॅक्सीने मुन्सियारी पर्यंत पोहोचता येते, अथवा हा प्रवास बसने देखील करता येतो. मुन्सियारी ज्या पंचचुली पर्वतराजीमध्ये वसले आहे, या पर्वतराजी विषयी एक अतिशय रोचक आख्यायिका लोकप्रिय आहे. या ठिकाणी पांडवांनी पाच वेगवेगळ्या चुली मांडून त्यावर आपले भोजन शिजविले असल्याची कथा प्रसिद्ध असल्याने या पर्वतराजीतील पाच शिखरांना ‘पंचचुली’ नाव पडल्याचे म्हटले जाते. मुन्सियारी गावातून हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांचे अभूतपूर्व दृश्य पहावयास मिळते.
Munasari3
मुन्सियारी गावापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर मदकोट नावाचे आणखी एक गाव आहे. ज्यांना छायाचित्रे टिपण्याची आवड आहे, त्यांनी मदकोट गावाला आवर्जून भेट द्यावी.

Leave a Comment