मोदींच्या मुलाखतीचा शिवसेनेने घेतला समाचार

narendra-modi
मुंबई – शिवसेनेने मोदींच्या मुलाखतीचा समाचार घेत पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले असून पंतप्रधान हे बचावात्मक पवित्र्यात दिसले 2019ची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर, अंगप्रदर्शनात स्पष्टपणे दिसत होती, असे म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली होती. शिवसेनेने या मुलाखतीवरुन सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. एक पत्रकार परिषद घ्यावी व प्रश्नोत्तरे मोदी यांनी करावीत अशी मागणी होती. मोदी यांनी या पार्श्वभूमीवर एकाच वाहिनीस मुलाखत देऊन ती प्रसारित केली. राममंदिर, नोटाबंदी, उद्याच्या सार्वत्रिक निवडणुका वगैरे विषयांवर ते या मुलाखतीतून बोलले, पण जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तरे मिळाली का?, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

मोदींनी राम मंदिराबाबत स्पष्टीकरण दिले असून शिवसेनेने यावरुन भाजपला खडे बोल सुनावले. मोदी राम मंदिराबाबत पहिल्यांदाच खरे बोलले. त्यांच्यासाठी राममंदिर हा अग्रक्रमाचा विषय नाही. सत्ता रामाच्या नावावर मिळाली व कायद्याचे राज्य त्यांच्या हाती आले तरी श्रीराम हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे त्यांनी सांगितले. राममंदिर मोदी यांच्या बहुमताच्या राज्यात होणार नसेल तर कधी होणार, हा प्रश्न असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

ज्याप्रमाणे काँग्रेसला शीख हत्याकांडाबद्दल माफी मागावी लागली तसे हिंदू नरसंहाराबद्दल माफी मागा असे कोणी म्हणाले तर त्यांच्याही भावना समजून घ्या, असेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. भाजपला सत्ता राममंदिर व पाकिस्तान या दोन प्रमुख विषयांमुळे मिळाली आणि मोदी पंतप्रधान बनले, पण जनतेच्या हाती धुपाटणेच आले. मोदी यांनी पुढील निवडणूक जनता विरुद्ध महाआघाडी, असा नारा दिला आहे. मग त्यांना 2014 साली पाकिस्तान, इराणच्या जनतेने मतदान केले होते काय व पाच राज्यांत भाजपचा पराभव करणारा मतदार ही या देशाची जनता नव्हती काय?, असा प्रश्नांची सरबत्तीही अग्रलेखातून करण्यात आली आहे. नोटाबंदी हा झटका नव्हता, तर जनतेसाठी फाशीचा खटका होता, अशी टीका शिवसेनेने केली. मोदींची मुलाखतही नेहमीच्या भाषणासारखीच होती, असा टोलाही यात लगावण्यात आला आहे.

Leave a Comment