नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिप दरम्यान जोडीदारांनी सहमतीने ठेवलेले शारिरीकसंबंध बलात्कार ठरत नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील महिलेने डॉक्टरविरोधात दाखल केलेला गुन्हाही रद्द केला आहे. संबंधित महिला ही परिचारिका असून डॉक्टरसोबत काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे तिने म्हटले होते.
लिव्ह इन रिलेशनशिप दरम्यान शारिरीक संबंध बलात्कार नाही : सर्वोच्च न्यायालय
डॉक्टरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. संबंधित महिलेच्या पतीचे निधन झाले होते. ती पतीच्या निधनानंतर एका डॉक्टरकडे काम करु लागली. डॉक्टर आणि तिच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि लिव्ह इन रिलेशनमध्ये दोघेही राहू लागले. दोघांमधील संबंधांमध्ये दरम्यानच्या काळात तणाव निर्माण झाला आणि डॉक्टरविरोधात महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनीही या आधारे गुन्हा दाखल केला होता. डॉक्टरच्या वतीने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती.
नुकताच सर्वोच्च न्यायालयातील न्या. ए के सिकरी आणि एस अब्दुल नाझीर यांच्या खंडपीठाने या याचिकेवर निकाल दिला आहे. बलात्कार आणि संमतीने ठेवलेले शरीरसंबंध यात फरक असतो. अशा प्रकरणात सखोल चौकशी आवश्यक असते. आरोपी खरच पीडितेशी लग्न करण्यास तयार होता किंवा त्याचा काही दुसराच हेतू होता आणि त्याने वासना शमवण्यासाठी लग्नाचे खोटे आश्वासन दिले होते जे फसवणुकीच्या अंतर्गत येते, असे न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणात स्त्री- पुरुषाने संमतीने शरीरसंबंध ठेवले होते आणि त्यामुळे हा बलात्कार ठरत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.