महिलांच्या सुरक्षेकरिता ‘लीफ वेअरेबल्स’ने तयार केला नेकलेस

necklace
केवळ भारतामधेच नाही, तर जगातील बहुतेक सर्वच देशांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. भारतामध्ये ही हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अधिकच गंभीर होत चालला आहे. आजच्या काळामध्ये महिला सार्वजनिक ठिकाणी, प्रवास करीत असताना आणि क्वचितप्रसंगी अगदी स्वतःच्या घरामध्ये देखील सुरक्षित नाहीत. या समस्येवर तोडगा म्हणून आजकाल मोबाईल फोन वर अनेक अॅप्स विकसित करण्यात आली आहेत. या अॅप्सच्या द्वारे महिलांना संकटप्रसंगी आपल्या आप्तेष्टांना संपर्क करणे शक्य होऊन, वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेणे देखील शक्य होऊ शकते.
necklace1
याच संकल्पनेवर आधारित लीफ वेअरेबल्स या भारतीय कंपनीने एक गळ्यात घालण्याचा पेंडंट नेकलेस तयार केला आहे. या नेकलेसमध्ये असणाऱ्या पेंडंटमध्ये आवाज रेकॉर्ड करता येण्याबरोबरच व्हिडियो रेकॉर्डिंग करण्याची सोय आहे. तसेच कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी आपली मित्रमंडळी किंवा नातेवाईकांना संपर्क साधणे देखील या नेकलेसच्या माध्यमातून शक्य होणार आहे. या नेकलेसच्या माध्यमातून इतरांना मदतीचा संदेश पाठविण्यासोबतच महिलेचे लोकेशन देखील समजण्यास मदत होणार आहे.
necklace2
या नेकलेसच्या, प्रायोगिक पातळीवर निरनिराळ्या ठिकाणी यशस्वी चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये निरनिराळ्या इमारती, सार्वजनिक वाहने आणि फारशी वस्ती नसलेल्या ठिकाणी देखील या नेकलेसची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. हा नेकलेस तयार करणाऱ्या लीफ वेअरेबल्स या कंपनीला ‘वुमेन्स सेफ्टी एक्स प्राईझ’ या सन्मानाने गौरविण्यात आले असून, हा सेफ्टी नेकलेस अधिक विकसित करण्यासाठी एक मिलियन डॉलर्सची रक्कम पुरस्काराअंतर्गत देण्यात आली आहे. एका सर्वेक्षणाच्या अनुसार भारत हा महिलांसाठी असुरक्षित असलेला देश म्हटला गेला आहे. सर्वसाधारणपणे पाचपैकी किमान एक महिला कधी ना कधी संकटाच्या प्रसंगांना तोंड देत असल्याचे या सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे. अलीकडच्या काळामध्ये भारतीय कायदेव्यवस्था महिलांच्या रक्षणार्थ अधिक काटेकोर करण्यात आली असली, तरी आजही महिलांची सुरक्षितता हा प्रश्न भारतामध्ये मोठा आहे.

Leave a Comment