
नवी दिल्ली – आता सलग ३० दिवसांपर्यंत बेरोजगार असल्यास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओचे सदस्य आपल्या खात्यातून ७५ टक्के रक्कम काढू शकतात. त्याचबरोबर त्यांना आपले खातेही कायम ठेवता येईल. ईपीएफओच्या विश्वस्तांची बैठक झाल्यानंतर केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली. ईपीएफओच्या विश्वस्तांच्या केंद्रीय बोर्डाचे गंगवार चेअरमनही आहेत.
सलग ३० दिवस बेरोजगार असल्यास काढता येणार ७५ टक्के पीएफ
ईपीएफओचा कोणताही सदस्य नवीन निर्णयानुसार आता सलग १ महिन्यापर्यंत बेरोजगार असल्यास ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम खात्यातून काढू शकतो आणि खाते कायम चालू ठेवू शकतो, अशी माहिती संतोष गंगवार यांनी दिली. ईपीएफओ सदस्य ईपीएफओ योजना १९५२ च्या तरतुदीनुसार २ महिन्यांपर्यंत बेरोजगार राहिल्यास आपली उर्वरित २५ टक्के रक्कम काढून खातेही बंद करु शकतो. ईपीएफओची ईटीएफ म्हणजेच एक्स्चेंज ट्रेडेट फंडमध्ये गुंतवणूक ४७ हजार ४३१.२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हा आकडा लवकरच १ लाख कोटींच्या पुढे जाईल. या गुंतवणुकीवर १६.०७ टक्के परतावा मिळत आहे, अशी माहिती संतोष गंगवार यांनी दिली.
