बंगालमधील हिंसाचार


आपल्या देशात सध्या सर्वात जास्त राजकीय वादळे येणारे राज्य म्हणून प. बंगालचा उल्लेख करावा लागेल कारण तिथे कोणतीही निवडणूक आता चौरंगी होणार आहे. सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस, डावी आघाडी आणि कॉंग्रेस या तीन दखलपात्र शक्ती म्हणून तिथे विचारात घेतल्या जात आहेतच पण आता भाजपानेही आपली ताकद पणाला लावून निवडणूक चौरंगी करण्यात यश मिळवले आहे. शिवाय तिथे सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांची पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा असल्याने त्या तिथे आपली सारी शक्ती पणाला लावून लढत आहेत. अशा या चार पक्षांमध्ये तिथे अतीशय चुरशीची लढाई होत आहे. ममता बॅनर्जी यांना तिथल्या लोकसभेच्या सगळ्या ४२ जागा जिंकून तिसर्‍या आघाडीतला मोठा पक्ष होण्याची स्वप्ने पडायला लागली आहेत. तसे झाल्यास आपला पीएम होण्याचा मार्ग आपोआपच मोकळा होईल असे त्यांना वाटते.

नाहीतरी देशात आता एवढ्या खासदारांना निवडून आणण्याची ताकद असणारा एकही नेता तिसर्‍या आघाडीत नाही. म्हणून ममता बॅनर्जी राज्यातली कोणतीही निवडणूक सगळ्या प्रकारची ताकद पणाला लावून लढवत असतात. आता तिथे पंचायत निवडणुका सुरू आहेत. काल तिथे मतदान झाले. मात्र हे मतदान शांततेत पार पडले नाही. राज्याच्या या ग्रामीण भागात झालेल्या हिंसाचारात १३ जण ठार झाले. खरे तर निवडणूक हिेंसाचारात पूर्वी बिहार आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्ये नावाजली होती पण आता याबाबत प. बंगालचे नाव घेतले जात आहे कारण युपी आणि बिहार याबाबत मागे पडले असून बंगालनेच आघाडी मिळवली आहे. या राज्यात २००३ साली झालेल्या पंचायत निवडणुकीतही हिंसाचार झाला होता आणि त्यावेळी ७८ लोक मारले गेले होते. २०१३ साली ३८ जण आणि आता २०१८ साली १३ अशी निवडणूक हिंसाचारातल्या बळींची संख्या कमी होत आली असली तरीही आहे तीही संख्या काही कमी नाही.

गेल्या निदान १० ते १५ वर्षांपासून देशातल्या कोणत्याही निवडणुका पूर्वीच्या मानाने शांततेत पार पडत आहेत. मात्र प. बंगालात नेहमीच हिंसाचार होतो. २०११ साली तिथली डाव्या आघाडीची ३५ वर्षांची सत्ता गेली आणि तृणमूल कॉंग्रेसचे सरकार आले पण डावी आघाडी आणि तृणमूल कॉंग्रेस या दोन पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच हिंसाचारात गुंतलेले असत. आता डावी आघाडी तुलनेने शांत झाली आहे पण भाजपाला तृणमूलच्या मनगटशाहीचा जादा त्रास व्हायला लागला आहे. कारण भाजपाने राज्यातल्या निवडणुकांत आता आक्रमक प्रचार करून राज्यातली दखलपात्र शक्ती होण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. यात भाजपाला कितपत यश येतेय ते दोनच दिवसांनी पंचायत निवडणुकीच्या निकालातून दिसून येणार आहेच.

Leave a Comment