इस्रोचा पराक्रम


इस्रोने म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने काल म्हणजे शुक्रवारी पीएसएलव्ही या प्रकारच्या रॉकेटच्या सी या मालिकेतील ४० व्या रॉकेटचा वापर करून ३१ उपग्रह अवकाशात सोडले. त्यातले केवळ तीन उपग्रह देशी असून अन्य २८ उपग्रह अन्य सहा देेशांचे आहेत. भारतीय शास्त्रज्ञांचा हा पराक्रम फारच कौतुकास्पद आणि आपली परदेशातली प्रतिमा उंचावणाराही आहे. सोडला जाणारा भारतीय उपग्रह शंभरावा आहे. अगदी याच मोेक्यावर इस्रोचे चेअरमन बदलले जात आहेत. डॉ. के. सिवन यांना चेअरमन म्हणून नेमण्यात आले आहे. ऑगष्ट महिन्यात पीएसएलव्हीचा एक प्रयोग फसला होता. तेव्हा पासून भारतीय शास्त्रज्ञांनी प्रयत्न करून ही मोहीम यशस्वी केली आहे.

या वेळी इस्रोच्या इतिहासावर नजर टाकल्यास जिद्दीने यशस्वी केलेल्या एका मोठ्या संस्थेचे उदाहरण आपल्या समोर येते. १९६० च्या दशकात विक्रम साराभाई आणि सतीश धवन यांनी सुरू केलेल्या या संस्थेने सातत्याने देशातल्या संशोधक आणि अभियंत्यांवर लक्ष ठेवले. त्यातले गुणी लोक हेरून त्यांना इस्रोत आणले. त्यांच्या कल्पकतेला वाव दिला. प्रोत्साहन दिले आणि आता ही संस्था जगातली एक नावाजलेली अंतराळ संस्था ठरली आहे. संस्थेची सुरूवात झाली तेव्हा एका चर्चमध्ये उत्पादन विभाग आणि गायीच्या गोठ्यात प्रयोगशाळा सुरू करावी लागली. सतीश धवन आणि विक्रम साराभाई हे धनाढ्य कुटुंबात जन्माला आले होते आणि त्यांची राहणी फार वरच्या दर्जाची होती पण, ते थुंबा येथे कामाला आले की, या गोठ्यातल्या प्रयोगशाळेत कंदिलाच्या प्रकाशात काम करीत बसत. एसीचा तर अजीबातच आग्रह नसे त्यांचा.

संस्थापकांनीच जमा केलेले डॉ. अब्दुल कलाम, वसंतराव गोवारीकर, कस्तुरीरंगन, माधव नायर असे याच संस्थेतले तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञच या संस्थेत पुढे चालून चेअरमन झाले. आता सिवन हे याच संस्थेत काम करीत करीत वरच्या पायर्‍या चढत गेले आणि आता चेअरमन होत आहेत. त्यांच्या रुपाने पहिला तमिळ माणूस या पदावर बसत आहे. त्यांनी रॉकेट विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून काम केलेले आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. इस्रोच्या कामाचा व्याप वाढत आहे. जादा रॉकेटांची गरच पडणार आहे. अशा वेळी खाजगी क्षेत्रातून काम करून घेण्याचेही एक मोठे काम करावे लागणार आहे.

Leave a Comment