ओबोरला अमेरिकेचा विरोध


जगातल्या तीन मोठ्या शक्ती म्हणून आता अमेरिका, चीन आणि भारताकडे पाहिले जात आहे. या तीन देशांचे परस्परांशी संंबंध कसे आहेत याला जागतिक राजकारणात फार महत्त्वही असते. तसा चीनचा भारतापेक्षा अमेरिकेकडे जास्त ओढा आहे कारण भारत हा त्याचा सख्खा शेजारी आहे. असे असले तरीही अमेरिकेने मात्र भारत आणि चीन या दोघांनाही समान अंतरावर ठेवलेले आहे. तेव्हा भारत आणि चीन यांच्यातील वादात अमेरिका नेहमीच नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेत असते. अमेरिका भारतावरून चीनला दुखवत नाही आणि चीनवरून भारताला दुखवत नाही.

चीन आणि भारत यांच्या दरम्यान चायना-पाकिस्तान व्यापार इकानॉमिक कॉरिडॉर वरून वाद आहे कारण हा मार्ग भारताच्या वादग्रस्त प्रदेशातून जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाकव्याप्त काश्मीरवरून वाद आहे कारण हा भाग भारताचा असल्याचा भारताचा दावा आहे. त्यातला काही प्रदेश पाकिस्तानने चीनला दिला असून त्या भागातून हा कॉरिडॉर चालला आहे. चीनचा हा मार्ग या भागातून पुढे तेलसंपन्न प. आशियापर्यंत जातो. त्यामागे चीनची जागतिक महत्त्वाकांक्षा आहे. कारण चीन तेलाच्या बाबतीत स्वावलंबी नाही. उद्या चालून भारत आणि चीन यांच्यात आर्थिक क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झालीच तर आपले वर्चस्व या प्रदेशावर असायला हवे असे चीनला वाटते आणि त्याच भावनेतून चीनने हा कॉरिडॉर बांधायला घेतला आहे. या महामार्गावरून पुढे आफ्रिका खंडावरही वर्चस्व निर्माण करता येते.

आपले हे सामर्थ्य आणि योजना सगळ्या जगाला कळली पाहिजे असे वाटल्यावरून चीनने जगातल्या अनेक देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करून एक परिषद घेतली आणि आपला हा कारिडॉर म्हणजे जगाच्या प्रगतीची निशाणी कशी आहे याची माहिती त्यांना दिली. पण हा मार्ग भारताच्या सार्वभौमत्वाचा अधीक्षेप करणारा असल्याचे सांगून भारताने या परिषदेवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी भारत निदान या बाबतीत तरी एकाकी पडला होता कारण भारताशिवाय अन्य कोणत्याच देशाच्या प्रतिनिधीने या परिषदेवर बहिष्कार टाकला नव्हता. अमेरिकेचे संरक्षण मंत्री नुकतेच भारतात येऊन गेले आणि त्यांनी भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी बोलणी केल्यानंतर त्यांनाही भारताची भूमिका पटली. त्यांनी आता हा कॉरिडॉर भारताच्या वादग्रस्त जागेतून जात असल्याच्या भारताच्या भूमिकेला पाठींबा दिला असून भारताची या बाबतची बाजू भक्कम झाली आहे.

Leave a Comment