जपान – इंडिया सुरक्षा करार


जपानचे पंतप्रधान शिझो ऍबे हे भारताच्या दौर्‍यावर असून या दोन देशांत व्यापारी करार होत आहेत. बुलेट ट्रेनच्या पायाभरणी समारंभाचा आणि ऍबे – मोदी रोड शो चा गवगवा होत आहे पण या दौर्‍याला फार मोठा व्यापक आशय आहे याकडे दुर्लक्ष होत आहे. हा आशय असण्याचे कारण असे की, ही मैत्री आशिया खंडातल्या दोन मोठ्या आर्थिक महाशक्तींची मैत्री आहे. जागतिक राजकारणाचा आजवरचा सारा इतिहास जाणून घेतला तर असे दिसते की दोन महाशक्तींची मैत्री करण्याबाबत बोलणी सुरू झाली की, तिसर्‍या शक्तीचे कान टवकारले जातात कारण दोन देश एकत्र आले की त्यातून या तिसर्‍या शक्तीच्या नाड्या आवळण्याचा काही तरी डाव खेळला जातो असे त्या तिसर्‍या शक्तीला वाटत असते. आता जपान आणि भारत जसे जवळ यायला लागले आहेत तसे चीनचे कान टवकारले जात आहेत. या मैत्रीतून चीनच्या आर्थिक हिताला बाधा येईल असे काही घडते की काय याकडे चीनचे लक्ष आहे. शिझो ऍबे यांच्या भेटीच्या निमित्ताने चीनने केवळ कानच टवकारले आहेत असे नाही तर इशाराही दिला आहे.

चीन आणि भारत यांच्यातही चांगले संबंध प्रस्थपित होत आहेत पण तरीही या दोन देशात काही वादाचे मुद्दे आहेत. चीनने सुरू केलेला व्यापारी महामार्ग हा असाच एक वादाचा मुद्दा आहे कारण तो भारताच्या आणि पाकिस्तानच्या वादग्रस्त परिसरातून जात आहे. तो तसा जातो म्हणूनच तो प. आशियातल्या तेल संपन्न देशांंपर्यंत पोचू शकत आहे. भारताने चीनशी मैत्री संबंध वाढवत असतानाच या मार्गाविषयीचा आपला आक्षेपही नोंदविलेला आहे. एवढेच नाही तर चीनच्या या व्यापारी महामार्गाला शह देण्यासाठी भारताचाही आफ्रिका खंडापर्यंत जाणारा असाच महामार्ग टाकला जाईल असे सूचित केले आहे. चीनचा महामार्ग भारताला दुखावणारा आहे तसा भारताचा हा आफ्रिकेकडे जाणारा महामार्ग चीनला दुखावणारा नाही तरीही चीनला तो चिमटा काढणारा आहे. त्यामुळे चीन या भारताच्या आफ्रिका मार्गाबाबत सावध झाला आहे. खरे तर असा मार्ग तयार करण्याच्या संदर्भात भारत आणि चीन यांच्या क्षमतेत मोठे अंतर आहे आणि याबाबत चीन भारताच्या फार पुढे आहे. भारत मागे असला तरीही त्याला जपानची मदत मिळाली तर तो असा महामार्ग टाकू शकतो. म्हणून जपानचे पंतप्रधान शिझो ऍबे यांच्या भारत दौर्‍याच्या मोक्यावर चीनने भारत आणि जपान या दोघांनाही इशारा देणारे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

भारत आणि जपान यांनी मैत्री करावी, काही उद्योगांत भागिदारीही करावी पण कोणाच्या तरी विरोधात युती करण्याच्या भानगडीत पडू नये असे चीनने दोन्ही देशांना बजावले आहे. हा इशारा आफ्रिका मार्गाबाबत तर आहेच पण या दोन देशांत होत असलेल्या संरक्षण कराराच्या संदर्भातही आहे कारण असा करार झाला तर आशिया खंडात चीनच्या विरोधात भारत आणि जपान या दोन देशांची युती होते आणि नकळतपणे चीनच्या दादागिरीला शह बसतो. तेव्हा चीनची ही काळजी कशामुळे निर्माण झाली आहे हे आपल्या लक्षात येते. भूतान, नेपाळ हे दोन देश चीनच्या डोळ्यात सलायला लागले असून तिबेट प्रमाणेच याही दोन देशांना आपल्यात सामावून घेण्याचा चीनचा इरादा आहे. या त्याच्या आक्रमकतेला वेसण घालण्याची ताकद केवळ भारत आणि जपान यांच्या युतीत आहे. म्हणून चीनने युती न करण्याचा इशारा दिला आहे. अर्थात चीनचा हा इशारा दुर्लक्षून भारत आणि जपान यांच्यात संरक्षण करार होणार आहेत. जपानवर कोणी हल्ला केल्यास भारताने धावून जावे आणि भारतावर आक्रमण झाल्यास जपानने धावून यावे असे या करारात नमूद करण्यात येणार आहे.

जपानचे पंतप्रधान ऍबे हे भारताच्या दौर्‍यावर असतानाच उत्तर कोरियाने आपले नवे क्षेपणास्त्र जपानच्या दिशेने डागले आहे. काल त्याचे चाचणी उड्डाण झाले. ते क्षेपणास्त्र आपल्याकडे येत आहे हे जपानच्या लक्षातही आले पण ते कोणत्याही भूभागावर न पडता समुद्रात पडले पण उ. कोरियाने यावेळी केलेली दर्पोक्ती फार सूचक आहे. आपण क्षेपणास्त्रांचा वापर करून जपानला समुद्रात बुडवून टाकू आणि अमेरिकेला बेचिराख करू असे उ. कोरियाने म्हटले आहे. हे शक्य नाही पण जपानच्या हृदयात धडकी भरण्यास पुरेसे आहे. त्यामुळे जपान घाबरून गेलेला आहेच कारण उ. कोरियाच्या रूपाने एक अस्वस्त्र सज्ज राष्ट्र त्याचा शत्रू म्हणून उभे रहात आहे. अशा वेळी आशिया खंडातल्या एखाद्या देशाचा सामरिक पाठींबा त्याला आवश्यक वाटत असल्यास ते काही फारसे चूक नाही. जपानने त्या दृष्टीने भारताशी हातमिळवणी केली आहे. भारताला जपानच्या पैशाची गरज आहे आणि जपानला भारताची लष्करी मदत हवी आहे. या गरजेतून या दोन देशांची मैत्री पक्की होत आहे. जपानची ही गरज लक्षात घेऊन नरेन्द्र मोदी यांनी जपानकडून काही आर्थिक फायदे करून घेतले आहेत. यात मोदी यांची राजनीती किती चातुर्याने आखली जात आहे याचे प्रत्यंतर येते. म्हणूनच जपानकडून आपल्याला मिळणारी बुलेट ट्रेन ही ५० वषार्ंंच्या परतफेडीच्या आणि ०.०१ टक्के दराच्या व्याजाच्या दरात मिळाली आहे.

Leave a Comment