केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी……


महिलांना आपले केस लांबलचक आणि दाट असावेत असे वाटते. त्यासाठी त्या काही काळजीही घेत असतात पण काही वेळा काही सामान्य वाटणार्‍या सूचना केसांसाठी उपयुक्त ठरतात. उदा. केस ओले असताना विंचरू नयेत. कारण ते ओले असताना विंचरले तर तुटण्याची भीती असते. तेव्हा आधी केस पुसून कोरडे करून घ्यावेत. त्यांना मऊ करणारे क्रीम लावावे. आधी केसांची टोके विंचरावीत आणि मग वरपर्यंत जावे. त्यामुळे केस तुटत नाहीत. लांब केस सौंदर्यासाठी कितीही चांगले असले तरीही त्यांची काळजी तेवढीच कसोशीने घ्यावी लागते. लांब केसांचा गुंता होण्याची शक्यता असते. हा गुंता दररोज काढला पाहिजे. न काढल्यास तो मोठा होतो आणि तो सोडवताना केस तुटण्याची व पातळ होण्याची शक्यता असते.

केस दररोज धुवावेत का हा प्रश्‍न अनेकदा विचारला जातो पण दररोज केस धुण्याने केसांत कोरडेपणा येण्याची शक्यता असते. केसांत एक नैसर्गिक तेलकटपणा असतो तो कमी झाला की केस चमक हरवून बसतात. तेव्हा केस हे आठवड्यातून दोनदा किंवा फारतर तीनदा धुवावेत. कंडीशनर हा लावलाच पाहिजे कारण त्यामुळे केस चमकदार आणि मऊ राहतात. परिणामी केसांचा गुंता कमी होतो. केसांची रचना करताना केस आवळले जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. नाही तर केसांना ओढ बसते. केसांना बांधण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिना बसवू नका. त्यासाठी कापडापासूून तयार केलेल्या बँडस्चा करा. नसता केसांना ताण पडतो. रबर बँडही चालतील कारण ते फार टाईट नसतात.

कोरड्या आणि खरखरीत केसांसाठी केसांना ऑईल ट्रीटमेंट द्यायला काही हरकत नाही. त्यासाठी केसांना तेल लावावे आणि त्यांना त्याच अवस्थेत अर्धा तास ठेवून मग कोमट पाण्याने धुवावेत. त्यासाठी हलका शांपूही वापरायला हरकत नाही. अशी घरगुती ट्रीटमेंट आठवड्यातून एकदा करायला काही हरकत नाही. सारखी सारखी एकाच प्रकारची हेअर स्टाईल करू नये. ती अधुन मधुन बदलावी. नेहमी एकाच प्रकारची हेअर स्टाईल केल्याने केस एकाच दिशेने ओढले जातात. त्यांना त्याच प्रकारचे वळण लागते. तेव्हा त्यांना प्रत्येक वेळा वेगळे वळण लागेल अशी स्टाईल करावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment