
खादीच्या वस्तू जीएसटीतून मुक्त,महागड्या गाड्यांवर सेस वाढविला
नवी दिल्ली – हैदराबादमध्ये जीएसटी परिषदेची 21 वी बैठक नुकतीच झाली. या परिषदेत महागड्या गाड्या, एसयूव्ही आणि मध्यम किंमतीच्या गाड्यांवरील सेस 2 ते 7 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मातीच्या मूर्ती, अगरबत्ती, रबर बँड आणि रेनकोट यांसारख्या 30 वस्तूंवरील जीएसटीचा दर कमी केला आहे. खादी ग्रामोद्योग केंद्रांमध्ये विकल्या जाणाऱ्या खादीच्या वस्तू जीएसटीतून मुक्त केल्या आहेत.
तीस वस्तूंवरील जीएसटी कमी
या बैठकीकडे सगळ्याचे लक्ष गाड्यांवरील सेसकडे होते. 20 व्या बैठकीत सेस 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. कायद्यात फेरबदल करण्यासाठी राष्ट्रपतींनी अध्यादेशही जारी केला होता. महागड्या गाड्यांवर सेस वाढवण्यात आला असला तरी देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने दर न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. 30 वस्तूंवरील दर कमी केल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल, असा दावा सरकारने केला आहे.
बैठकीतील निर्णय –
1) हायब्रीड कारवर पहिल्याप्रमाणेच सेस आणि जीएसटी मिळून कराचा दर 42 टक्केच असेल.
2) मध्यम श्रेणीतील कारवर सेस मिळून जीएसटीचा दर 43 टक्क्यांऐवजी 45 टक्के असेल. म्हणजेच सेस 2 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
3) पेट्रोल आणि डीझेल कारवर पहिल्याप्रमाणेच सेस आणि जीएसटी मिळून कराचा दर 29 ते 31 टक्के असेल.
4) मोठ्या किंमतीच्या कारवर सेस मिळवून जीएसटीचा दर 43 टक्क्यांऐवजी 48 टक्के असेल. म्हणजेच सेस 5 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
5) एसयूव्हीवर सेस मिळवून जीएसटीचा दर 43 टक्क्यांऐवजी 50 टक्के असेल. म्हणजेच सेस 7 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
