बिहार कॉंग्रेसमध्ये पेच


बिहारात नितीशकुमार यांनी भाजपाशी असलेली आपली जुनी मैत्री पुन्हा स्थापित केल्याने महागठबंधनाच्या प्रयोगाला मोठा धक्का बसला पण तरीही लालूप्रसाद यादव आणि राहुल गांधी यांचा हे गठबंधन जारी ठेवण्याचा निर्धार आहे. त्याच हेतूने हे दोघेही प्रयत्नात असतानाच त्यांच्या प्रयत्नांना आतूनच घातपात होण्याची शक्यता दिसायला लागली आहे. आपण भाजपाला हद्दपार करण्यासाठी लालूंशी मैत्री करावी का असा प्रश्‍न बिहारमधील कॉंग्रेस आमदारांना सतवायला लागला आहे. कारण तेच आहे जे नितीशकुमार यांना सतवायला लागले होते. लालूंच्या विरोधात अनेक खटले दाखल होण्याची शक्यता आहे. त्यांची प्रतिमा आता अधिक खराब होत चालली आहे.

अशा वेळी आपण त्यांच्या हातात हात दिला तर आपलीही प्रतिमा बिघडत जाईल असे कॉंग्रेसच्या आमदारांना वाटत आहे. राज्यात आता २७ कॉंग्रेस आमदार आहेत. त्यातल्या १९ जणांंनी ही भूमिका मांडली असून आपण लालूंशी फारकत घ्यावी अशी मागणी करायला सुरूवात केली आहे. राज्य कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी या आमदारांचे नेतृत्व करीत आहेत. त्यांनी या १९ आमदारांच्या वतिने राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे ही मागणी केली. राहुल गांधी यांच्यासमोर मोठाच पेच निर्माण झाला आहे कारण त्यांना हे माहीत आहे की आपण लालूंशी असलेली मैत्री तोडली तर आपल्याला बिहारात पाय ठेवायलाही जागा राहणार नाही. पूर्वी कॉंग्रेसचे चार ते पाच आमदार निवडून येत असत पण आता ही संख्या १७ आहे ती केवळ आपण महागठबंधन केले आहे म्हणून आहे हे त्यांना माहीत आहे.

तेव्हा केवळ प्रतिमेसाठी आपण लालूंशी युती तोडली तर आपल्याला आपले या राज्यातले स्थान गमवावे लागेल हे राहुल गांधी यांना कळते. म्हणून त्यांनी, कॉंग्रेस पक्ष लालूंशी असलेली युती कधीच मोडणार नाही असे जाहीर केले आहे. अर्थात त्यांनी आपल्यापुरता हा प्रश्‍न सोडवला असला तरीही आमदारांची अस्वस्थता कमी झालेली नाही. कॉंग्रेसने लालूंशी युती टिकवायची ठरवलीच तर हे सारे आमदार कोणत्याही क्षणी नितीशकुमार यांच्या जनता दल (यू) या पक्षात जायला कमी जास्त करणार नाहीत. म्हणजे युती मोडली तरी अडचणीत आणि न मोडली तरी अडचणीतच आहोत. आता राहुल गांधी यांनी लालूंशी युती मोडावी अशी मागणी करणारे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनाच बदलून टाकण्याचे ठरवले आहे.

Leave a Comment