शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापनदिन


शेतकरी कामगार पक्ष या नावाचा एक पक्ष या महाराष्ट्रात आहे हे आता मुद्दाम सांगितले तरच लोकांना लक्षात येते. कारण एकेकाळी महाराष्ट्रात प्रभावी अस्तित्व असलेल्या या पक्षाची स्थिती दयनीय झाली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कॉंग्रेसमध्ये नाराज असलेल्या काही नेत्यांनी या पक्षाची स्थापना केली होती. कॉंग्रेस हा पक्ष देशात बहुजन समाजाच्या हितसंबंधांचे राजकारण करणार नाही असे वाटल्यावरून डाव्या विचाराच्या काही कॉंग्रेसी नेत्यांनी हा पक्ष स्थापन केला. राज्यात नंतर कॉंग्रेसचे मोठे नेते झालेले काही कार्यकर्ते सुरूवातीला या पक्षाच्या प्रारंभिक बैठकांतही सहभागी झाले होते. पण त्यांना या पक्षाविषयी फारशा अपेक्षा वाटेनात म्हणून त्यांनी गांधी नेहरुंच्या कॉंग्रेसमध्येच राहणे पसंत केले. कट्टर डाव्या नेत्यांनी मात्र कॉंग्रेस पक्षाचे भांडवलशाही वळण पाहून आपला हाच शेका पक्ष बळकट करण्याचे ठरवले. त्यांनी हा पक्ष चांगला संघटितही केला. १९७० च्या दशकापर्यंत शेका पक्ष ही महाराष्ट्रातली दखलपात्र राजकीय शक्ती होती. नंतर मात्र या शक्तीचे खच्चीकरण झाले.

उस्मानाबाद, रायगड, परभणी, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नांदेड अशा काही जिल्ह्यात या पक्षाने चांगला जम बसवला होता. १९७७ साली तर जनता पार्टीशी युती करून या पक्षाचे सहा खासदार लोकसभेवर निवडून आले होते. पण त्यानंतर एवढे खासदार निवडून आणणे या पक्षाला कधीच शक्य झाले नाही. आता तर केवळ रायगड जिल्ह्यातच या पक्षाचे अस्तित्व राहिले असून तेही केवळ जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबामुळे टिकून आहे. गणपतराव देशमुख हे निष्ठावान नेते ५५ वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत. त्यांचा हा निवडणूक जिंकण्याचा विक्रम हा काही पक्षाचा विक्रम नाही. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, सांगोल्यातल्या जातीय समीकरणाचा आणि त्यांच्या निरलस कामाचा विक्रम आहे. सांगोल्याचे मतदार त्यांना निवडून देतात पण ते शेका पक्षाचे आहेत म्हणून निवडून देत नाहीत तर गणपतराव देशमुख म्हणून निवडून देतात. त्यांच्या कित्येक मतदारांना शेका पक्ष हा काय आहे हेही माहीत नाही. गेल्या काही वर्षात तर हा पक्ष इतका निष्प्रभ झाला आहे की, त्याचे अस्तित्वही कोणाला जाणवत नाही आणि नव्या पिढीला या पक्षाचे आकर्षण राहिलेले नाही. या पक्षात जेवढे जुने नेते उरले आहेत ते अजूनही जुन्याच विचारांना चिकटून बसले होते पण आता या पक्षाचे पुुनरुज्जीवन करण्याची कल्पना पुढे आली आहे.

पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नव्या पिढीतले नेते पुढे येण्याची गरज आहे. तसे ते येतीलही पण नेते नवे पण विचार जुने अशी अवस्था राहिली तर मात्र नवे रक्त पक्षात येऊनही पक्षाची अवस्था आहे तशीच राहील आणि वेळ पडल्यास ती त्यापेक्षा वाईट होईल. पक्षाचा विचार आता तरी दोन पातळ्यांवर केेला पाहिजे. पहिली पातळी आहे संघटनेची आणि दुसरी आहे ती विचाराची किंवा तत्त्वज्ञानाची. या दोन पातळ्यांवर कालसुसंगत योजना आखली आणि तिची निकराने अंमलबजावणी केली तरच पक्षाला चांगले दिवस येतील. पक्षाची डावी विचारसरणी कायम ठेवण्याचा विचार आता या पक्षाच्या थिंक टँक मध्ये बोलून दाखवला जात आहे. अर्थात ही विचारवंत मंडळी विचारसरणीच्या पातळीवर परिपक्वपणे निर्णय घेतीलच पण तसा निर्णय घेताना त्यांना कथित डाव्या विचारापासून दूर जावे लागेल. आजच्या तरुणांना डावी विचारसरणी म्हणजे नेमके काय हे नीट माहीतही नाही आणि असले तरीही या विचारसरणीच्या मर्यादा आता प्रकट झाल्या असल्याने डावा विचार हा कालसुसंगत नाही अशी नव्या पिढीची भावना आहे.

देशात सध्या भाजपाचा जोर आहे. भाजपाचा विचार हिंदुत्ववादाचा आहे. हिंदुत्ववादाची विचारसरणी हा एक भोंगळ प्रकार आहे. हिंदुराष्ट्र म्हणजे नेमके काय यावर संघ परिवारातले १० नेते दहा तोंेडांनी बोलतात. पण आज स्वत:ला डावे म्हणवणारे नेते याच विचाराला चुकीने उजवी विचारसरणी म्हणत आले आहेत आणि तिचा प्रतिकार करणे म्हणजे डावे राजकारण अशी ढोबळ मांडणी करीत आले आहेत. देशातल्या हिंदुत्ववादी शक्तीचे तरुणांना आकर्षण आहे ते मुस्लिम द्वेषातून निर्माण झालेले आहे. स्वत:ला सेक्युलर म्हणवणार्‍या पक्षांनी सेक्युलॅरिझमच्या नावाखाली सतत मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळल्या आणि हिंदूंचा अवमान केला. भाजपाच्या वाढीचे ते कारण आहे. म्हणूनच हा विचार आपला मानणारा कमी वैचारिक कुवतीचा कार्यकर्ता गो मांस बाळगणारांना मारण्यात काही चूक नाही असे मानत असतो. मग नेते व्यासपीठावरून काही का म्हणेनात. डाव्या आणि सेक्युलर पक्षांचे राजकारण नेहमीच ढोंगीपणाचे राहिले आहे. अजूनही तोच प्रकार सुरू आहे. या ढोंगामुळेच भाजपाच्या झेंड्याखाली हिंदू मते एकत्र होत आली. अजूनही ती एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मोदींचा प्रभाव वाढतच आहे. नव्या स्वरूपातल्या शेका पक्षाने या बाबतीत मागच्या पानावरून पुढे अशी विचारसरणी मांडली तर त्याला भाजपाच्या या वाढत्या वर्चस्वाला शह देणे शक्य होणार नाही. तेव्हा खरे सेक्युलर धोरण आणि आर्थिक आघाडीवर वास्तव धोरणे अशी काही वैचारिक लाईन पकडली तरच पक्षाकडे नवा मतदार आकर्षित होईल.

Leave a Comment