
तमीळनाडूतील रामेश्वरम मंदिरापासून साधारण १३ किमी अंतरावर कोदंडरामस्वामी मंदिर नावाचे एक ठिकाण असून या मंदिराजवळील शिवलिंग समुद्राच्या पाण्यात तरंगते. भाविक पाण्यातून जाऊनच या शिवलिंगाची पूजा करतात. असे सांगितले जाते की रामाने रावणाचा श्रीलंकेत पराभव करून वध केल्यानंतर त्याचा भाऊ बिभिषण याला याच जागी राज्याभिषेक केला होता. बिभिषणाचे भारतातील हे एकमेव मंदिर मानले जाते. कोदंडधारी राम मंदिरात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान व बिभिषण यांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर ५०० ते १ हजार वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते व रामेश्वरवरमला १९६४ साली बसलेल्या भीषष चक्रीवादळाच्या तडाख्यात हे एकमेव मंदिर वाचले होते असेही समजते.
समुद्रातील तरंगते शिवलिंग
या मंदिरांच्या भिंतीवर पेंटींग्ज केली गेली असून त्यात ही कथा चित्रित केली गेली आहे.बंगालची खाडी व मन्नारखाडी मध्ये हे मंदिर व शिवलिंग आहे. ते अशा दगडापासून बनले आहे, जे दगड पाण्यात तरंगतात. याच दगडापासून वानरसेनेने श्रीलंकेवर चढाई करण्यासाठी रामसेतू बनविला होता. येथे एक दुर्बीणही ठेवली गेली असून त्यातून हा सध्या समुद्रात बुडलेला रामसेतू पाहता येतो. हा सेतू ४८ किमी आहे असेही सांगितले जाते.
