महागडे फोन बनविणारी व्हर्च्यू कंपनी बंद होणार


मौल्यवान हिरे माणके, सोने जडवून व महागड्या लेदरचा वापर करून एकापेक्षा एक महागडे स्मार्टफोन बनविणारी कंपनी व्हर्च्यू आर्थिक समस्यांमुळे बंद केली जाणार असल्याचे समजते. लग्झुरीयस फोन मेकींगसाठी ही कंपनी जगात प्रसिद्ध आहे. त्यांच्या फोन्सच्या किंमती कोट्यावधी रूपयांत असतात. कंपनी बंद पडल्यामुळे २०० जणांवर बेरोजगारीची कुर्‍हाड पडणार आहे. कंपनी विक्रीपासून वाचविण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले असल्याचेही सांगितले जात आहे. बाजारातील स्पर्धेला तोंड देण्यात कंपनीला अपयश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अन्य कंपन्या महागडे फोन बनविण्याच्या क्षेत्रात उतरल्या आहेत व ग्राहक आकर्षित करण्यासाठी त्या विविध सुविधाही देत आहेत. व्हर्च्यू सिग्नेचर फोनची रेंज ९ लाखापासून ३२.६ लाख रूपयांपर्यंत आहे. कंपनीतील सर्व फोन हाताने बनविले जातात व त्यामुळे त्यांचे उत्पादनही मर्यादित संख्येत होते. पूर्वी ही कंपनी चिनी मालकाकडे होती ती त्याने हकन उजन या तुर्की माणसाला विकली होती. १९९८ साली नोकियाने या कंपनीची स्थापना केली होती व २०१२ साली ती विकली गेली. त्यानंतर कंपनीने नोकिया ओएस बंद करून अँड्राईड ओएस स्वीकारली होती. अन्य कंपन्या ग्राहकांना त्यांना परवडतील व आवडतील अशी रत्ने फोनमध्ये जडवून देतात या कंपनीत मात्र ती सुविधा मिळू शकत नाही.

Leave a Comment