नियमांचा अतिरेक?


राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेतल्या जात असताना मुलांना कॉपी करण्याची संधी मिळू नये म्हणून परीक्षा घेणार्‍या मंडळाने मुलांच्या ड्रेसकोडबाबत कमालीचा आग्रह धरला होता. कारण आजची पिढी फार हुशार झालेली आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ही मुले कॉपी करण्याच्या अनेक युक्त्या शोधायला लागलेली आहेत. मात्र या निमित्ताने करण्यात आलेल्या नियमांची काही ठिकाणी फारच कडक अंमलबजावणी करण्यात आली. केरळमध्ये असे चार प्रकार घडले. त्यातल्या एका प्रकारात एका मुलीला अंतर्वस्त्रे काढून परीक्षेला जाण्यास परवानगी देण्यात आली. हा प्रकार खरोखर धक्कादायकच म्हणावा लागेल. तिला ही वस्त्रे काढण्यास भाग पाडणार्‍या शिक्षिकेला तिच्या अंतर्वस्त्रातून कशी कॉपी केली जाईल अशी शंका होती याचा काही उलगडा झालेला नाही.

हे काही नियमांचे पालन म्हणता येणार नाही. हा नियमांच्या नावाखाली केला गेलेला अगाऊपणा आहे. या मुलीला अंतर्वस्त्रे काढण्यास भाग पाडणारी शिक्षिका कसल्या तरी विकृतीने पछाडलेली असणार हे निश्‍चित. असे विकृत प्रकार सोडले तर बाकीच्या काही प्रकारात परीक्षार्थींवर घालण्यात आलेली बंधने उचितच म्हणावी लागतील. कारण काही ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या जीन्स पॅन्ट बदलण्यासा भाग पाडले गेले. काहींना अशा पँटीवरील बटणे बदलायला लावली तर काही मुलांना लांब बाह्यांचे शर्ट बदलण्यास सांगण्यात आले किंवा बाह्या कापायला लावल्या.

या प्रकारात मात्र काही अतिरेक वाटत नाही. कारण आता बाजारामध्ये एवढी छोटी छोटी इलेक्ट्रॉनिक उपकरणे मिळत आहेत आणि त्या उपकरणांमध्ये एवढा मजकूर साठवता येतो की एखादा विद्यार्थी त्या उपकरणाच्या साह्याने सहज कॉपी करू शकतो. परीक्षकांच्या डोळ्यात धूळ फेकू शकतो. वास्तविक पाहता परीक्षेच्या आधी परीक्षा मंडळाने कपड्यांच्या बाबतीत, दागिन्यांच्या बाबतीत एवढे नियम सांगितलेले होते की ते सगळे नीट पाळले असते तर अशवा प्रकारचा त्रास सहन करण्याची वेळ त्या मुलांवर आली नसती. या प्रकाराचा त्यांना त्रास झाला असेल तर त्याला ही मुलेच जबाबदार आहेत. त्यांनी ड्रेस कोडबाबत दिलेल्या सूचना स्वयंस्फूतीने स्वतःहूनच कसोशीने पाळायला हव्या होत्या. मात्र तसे होत नाही. आपल्याकडे नियम खूप सांगितले जातात आणि ते जाच्यासाठी असतात तेच लोक त्या नियमांची पर्वा करत नाहीत आणि कोणी ते पाळण्याचा आग्रह धरला तर आपण तो धरणार्‍यालच दोषी ठरवतो.

Leave a Comment