अन्नाची बचत


आपल्या देशातल्या आदिवासी आणि अतीशय गरीब असलेल्या लोकांना दोनवेळा पोटभर जेवता येईल एवढेही अन्न मिळत नाही. दुसर्‍या बाजूला भरपूर अन्न उपलब्ध असलेला एक वर्ग आहे. त्याला मात्र अन्नाची ददात नसल्यामुळे त्यांच्याकडून अन्नाची प्रचंड नासाडी केली जाते. म्हणजे एका बाजूला अन्न नकोसे झाले आहे तर दुसर्‍या बाजूला अन्नाच्या प्रत्येक कणासाठी लोक तरसत आहेत. आपल्या देशातली ५० टक्के बालके ही कुपोषित असतात. पाचव्या वर्षापर्यंत त्याचे जेवढे वजन आदर्श मानले जाते त्याच्या आसपाससुध्दा वजन नसणार्‍या मुलांचे प्रमाण ४० टक्क्यांएवढे आहे. म्हणजे एका बाजूला अन्नाचा नको एवढा सुकाळ तर दुसर्‍या बाजूला मन अस्वस्थ व्हावे असा दुष्काळ आहे.

अमेरिकेसारख्या माजोरी देशात तर जगातल्या २५ टक्के उपाशी लोकांना पुरेल एवढे अन्न नित्य वाया जात असते. अमेरिकेतल्या कोणत्याही संपन्न शहरामध्ये फिरलो तर अनेक हॉटेलांच्या समोर किंवा मागे प्रचंड अन्न फेकून दिलेले आढळते. भारतातही काही वेगळे चित्र नाही. भारता विशेष करून विवाह समारंभातल्या मेजवान्यांमध्ये टनानिशी अन्न फेकून दिलेले दिसते. एखाद्या विवाह समारंभात लाख लोकांच्या जेवणाची सोय केलेली असते आणि कमीत कमी १५ ते २० हजार गरीब लोक पोटभर जेऊ शकतील एवढे अन्न फेकून दिले जाते. अशा प्रकारे अन्नाची नासाडी करणे हा गरीबांच्या विरोधात केलेला गुन्हाच मानला पाहिजे. या संबंधात भारतामध्ये अजून तरी काही कायदे किंवा नियम झालेले नाहीत. परंतु जर्मनी, फ्र्रान्स, इटली या प्रगत देशांमध्ये अन्न नासाडी करण्याच्या विरोधात मोठे कडक कायदे करण्यात आलेले आहेत.

जर्मनीत ज्या मोठ्या हॉटेलांमधून वाया जाणारे अन्न गरिबांना वाटले जाते त्या हॉटेलांना करांमध्ये काही सवलती दिल्या जातात. इटलीमध्ये सातत्याने असे अन्न वाटणार्‍या संस्थांना बक्षिसे दिली जातात. तशा प्रकारची काही सोय भारतातही केली जाण्याची गरज आहे. कारण भारतामध्ये अन्नाची चणचण जाणवणारा वर्ग जसा मोठ्या प्रमाणावर आहे तसाच संपन्न समाजामध्ये माजोरीपणा आहे आणि ताटात भरपूर अन्न वाढून घेऊन त्यातले थोडेसेच खाऊन बाकीचे फेकून देणे ही त्यांची सवय आहे. या दोन्हींचा मेळ कोठेतरी साधला गेला पाहिजे. शेवटी अन्नाची बचत करणे म्हणजेच अन्नाची निर्मिती करणे आहे हे विसरता कामा नये.

Leave a Comment