
नवी दिल्ली : नव्या वर्षातील पहिल्या सेलची जंगी तयारी स्नॅपडीलनंतर आता अॅमेझॉननेही सुरु केली असून ‘अॅमेझॉन इंडिया’ने या सेलसाठी भारतात तब्बल ७ हजार ५०० जणांची हंगामी नोकरीसाठी भरती केली आहे. २० जानेवारीच्या मध्यरात्रीपासून अॅमेझॉनचा ‘ग्रेट इंडियन सेल’ २२ जानेवारीला रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरु असेल.
अमेझॉनकडून तब्बल ७ हजार ५०० जणांची हंगामी भरती
अॅमेझॉनच्या देशभरातील २७ सेंटर, १००हून अधिक डिलिव्हरी स्टेशन आणि १५सॉर्ट सेंटर्सवर या भरती केलेल्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आम्ही नव्या दमाच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करण्यास उत्सुक असून देशात ग्रेट इंडियन सेलमुळे ७५०० जणांना हंगामी काम मिळणार असून, पुढेही अॅमेझॉनसोबत काम करण्याची संधीही असेल, अशी माहिती अॅमेझॉन इंडियातील इंडिया कस्टमर फुलफिलमेंटचे मुख्य अखिलेश सक्सेना यांनी दिली.
अॅमेझॉनने लॉजिस्टिक आणि डिलिव्हरी या विभागांवर अधिक भर देण्याचे ठरवले आहे. जेणेकरुन अॅमेझॉनवरुन कोणतेही प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत अधिकाधिक लवकर पोहोचवता येईल. अमेरिकास्थित ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉनने भारतात ५ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
