अखेर खोट्या बातम्या थांबवण्यास फेसबुक राजी


सोशल मीडियावर अधिराज्य असलेल्या फेसबुकने जर्मनीत खोट्या बातम्यांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाय सुरू केले आहेत. जर्मनीत या वर्षी निवडणुका होणार असून हा देश खोट्या बातम्यांचे आगर झाला आहे, असे विश्लेषकांनी म्हटले आहे.

जर्मन भाषेतील सोशल मीडियावर नियंत्रण आणण्याचा पहिला उपाय फेसबुकने रविवारी जाहीर केला. “या समस्येवरील उपायाबाबत आम्ही काळजीपूर्वक काम करत आहोत. स्पॅमर्सनी प्रसृत केलेल्या खोट्या बातम्यांवर आमचे प्रयत्न केंद्रीत आहेत. वस्तुनिष्ठ, पूर्वग्रहदूषित बातम्यांकरिता आम्ही तिसऱ्या पक्षांनाही समाविष्ट करून घेतले आहे,” असे फेसबुकने निवेदनात म्हटले आहे.

या उपक्रमांतर्गत संशयित बातमी निदर्शनास आणून देणे अधिक सोपे होणार आहे. बातम्यांची तपासणी करण्यासाठी फेसबुकने करेक्टिव्ह या निष्पक्ष, ना-नफा आणि शोधपत्रकारिता संस्थेची मदत घेतली आहे.

“खोट्या बातम्या – खासकरून फेसबुकवरील – या आपल्या समाजाला असलेल्या सर्वात मोठ्या धोक्यापैकी एक आहेत. हे स्पष्ट आहे. येत्या महिन्यांत हा धोका आणखी मोठा होईल, अशी भीती आम्हाला वाटते,” असे करेक्टिव्हने निवेदनात म्हटले आहे.

न्यूयॉर्कमधील कोलम्बिया युनिव्हर्सिटीतील पत्रकारितेच्या प्राध्यापिका शीला कोरोनेल यांनी जर्मनी हे “खोट्या बातम्यांचे सर्वात ताजे आगर ” असल्याचे म्हटले आहे.

देशातील सत्ताधारी आघाडीचा घटक पक्ष असलेल्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे संसदेतील नेते थॉमस ओप्पेरमान यांनी यापूर्वी खोट्या बातम्यांसाठी दंडाची मागणी केली होती. “सोशल नेटवर्कना त्यांच्या जबाबदारीचे भान यावे, यासाठी कठोर शिक्षा आवश्यक आहे. त्यासाठी फेसबुकसारख्या संकेतस्थळाच्या लक्षात आणून देताच एका दिवसात आक्षेपार्ह मजकूर काढून न टाकणाऱ्यांवर 500,000 युरोंचा दंड लावावा,” असे त्यांनी सांगितले होते.

त्याच प्रमाणे “अपप्रचाराविरूद्ध संरक्षण केंद्र” निर्माण करावे, असा प्रस्ताव जर्मनीच्या गृह मंत्रालयाने यापूर्वी दिला होता.

Leave a Comment