तिसर्‍या महायुध्दाकडे

putin
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेला तणाव वाढला आहे. हा तणाव कितीही वाढला तरी तो सार्‍या जगाचा विषय व्हावा अशी अवस्था आता तरी नाही. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या तणावाला चीन आणि अमेरिका हे दोन कोन आहेत आणि हे दोन देश अनुक्रमे जगातील पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकाची महाशक्ती आहे. त्यामुळे या दोन देशात युध्द झाले तर सारे जग काही युध्दाच्या आगीत जळणार नाही. परंतु आशिया खंडात त्यातल्या त्यात दक्षिण आशियात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या दोन देशामध्ये युध्द अजून पेटलेले नाही आणि त्यांच्यातल्या संघर्षामध्ये कोणताही कडोनिकडीचा भावनिक मुद्दा गुंतलेला नाही. तरीही या दोन देशात युध्द होणार असेल तर ते टाळण्यासाठी सार्‍या जगाचे प्रयत्न जारी आहेत. युध्द नको असल्याची जाणीव या दोन्ही देशांमध्ये आहे. परंतु पश्‍चिम आशियातल्या सीरियावरून मात्र कोणत्याही क्षणी तिसरे महायुध्द पेटू शकेल अशी शक्यता वाटावी असे वातावरण निर्माण झालेले आहे.

पश्‍चिम आशियातील काही मुस्लीम देश, उत्तर आफ्रिकेतील इजिप्त सारखे देश आणि यूरोपातील तुर्कस्तान हे पश्‍चिम आशियातल्या संघर्षामध्ये प्रत्यक्ष गुंतलेले आहेत. म्हणजे सीरियातला हा संघर्ष आफ्रिका, आशिया आणि यूरोप या तीन देशांना व्यापणारा आहे. म्हणूनच या संघर्षात रशिया आणि अमेरिका हे गुंतलेले आहेत. या केवळ दोन महाशक्तीच आहेत असे नाही तर अण्वस्त्रधारी महाशक्ती आहेत. १९४५ पासून १९९० पर्यंत या दोन देशांमध्ये शीतयुध्द जारी होते आणि त्या शीतयुध्दामध्ये जग अनेकदा तिसर्‍या महायुध्दाच्या कड्यापर्यंत येऊन परत गेलेले आहे. म्हणजे या दोन देशातल्या युध्दाला शीतयुध्द असे नाव असले तरी प्रत्यक्षात त्यातून मोठा भडका उडण्याची शक्यता कोणी नाकारत नव्हते. मात्र ते युध्द झालेच असते तर त्याला अणुयुध्दाचे स्वरूप आले असते आणि त्यातून मानवतेचे मोठे नुकसान झाले असते. तशी जाणीव या दोन्ही देशांना होती. म्हणून त्यांचा आतला आवाज त्यांना महायुध्दापासून दूर नेत होता. ते शीतयुध्द संपले तेव्हाच रशियाचे महाशक्ती म्हणून असलेले अस्तित्वही संपुष्टात आले. पण आता पुन्हा एकदा रशिया शीतयुध्दोत्तर अवनतीतून स्वतःला सावरून महाशक्ती म्हणून उभा राहण्याच्या मनःस्थितीत आला आहे. पश्‍चिम आशियातल्या तीव्र संघर्षमय वातावरणात रशिया आता अमेरिकेच्या डोळ्यास डोळा भिडवायला लागले आहे.

रशियाच्या या सावरलेल्या अवस्थेमुळे जग पुन्हा एकदा तिसर्‍या महायुध्दाच्या संकटाकडे ओढले जायला लागले आहे. रशियाने काल तीन क्षेपणास्त्रे डागली. अमेरिकेकडे सर्वाधिक शक्तीशाली शस्त्रे आणि अस्त्रे असली तरी अमेरिकेची क्षेपणास्त्रे रशियाच्या मानाने तोकडी आहेत. रशिया आणि भारत या दोन्ही देशाचे क्षेपणास्त्रे हेच खरे सामर्थ्य आहे आणि रशियाच्या शस्त्रांच्या कोठारात जगातले सर्वाधिक वेगवान क्षेपणास्त्र मौजूद आहे. तेच जगातले सर्वाधिक लांब पल्ल्याचेही क्षेपणास्त्र असून ते १० हजार किलोमीटर इथंपर्यंत अण्वस्त्रे घेऊन जाण्यास समर्थ आहे. रशियाने काल हेच क्षेपणास्त्र डागले. त्याशिवाय अन्यही दोन क्षेपणास्त्रे डागून युध्दग्रस्त पश्‍चिम आशियातला तणाव वाढवण्यास मदत केली. रशियाच्या या हालचालींसोबतच अन्यही काही हालचालींमुळे कालचा दिवस तरी सार्‍या जगामध्ये जगाला तिसर्‍या महायुध्दाकडे घेऊन जाणारा दिवस म्हणून गाजला. रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी या सार्‍या हालचाली म्हणजे तिसर्‍या महायुध्दाचे संकेत नव्हेत असा खुलासा केला असला तरी मानवतेला मात्र आपण तिसर्‍या महायुध्दाकडे ओढले जात आहोत असे वाटत आहे.

इकडे पाकिस्ताननेही एक वेगळी जमवाजमव करायला सुरूवात केली आहे. दक्षिण आशियातील भारत पाकिस्तानसह सात देशांची सार्क ही संघटना आहे. या सात देशात भारत सर्वात मोठा देश असल्यामुळे या संघटनेवर भारताचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व पाकिस्तानने आजवर मुकाटपणे मानले. परंतु आता मात्र भारताच्या दादागिरीला शह देण्यासाठी एक वेगळी संघटना स्थापन करण्याचा प्रयास पाकिस्तानने सुरू केला आहे. पाकिस्तानच्या या संभाव्य नव्या आघाडीमध्ये चीनचा पुढाकार आहे. त्याशिवाय सार्क संघटनेतील काही देश आपल्या बाजूने येतील असा विश्‍वास पाकिस्तानला वाटत आहे. शिवाय त्यांच्या या आघाडीत इराण हा एक मोठा देश असेल. अशी संभाव्य आघाडी तयार करून भारताला एकटे पाडता येईल का हे पाकिस्तान बघत आहे. अर्थात भारताला एकटे पाडले तरी रशिया भारताच्या बाजूने राहणार आहे आणि अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने राहील अशी पाकिस्तानला आशा आहे. असे असले तरी अलीकडच्या काळात अमेरिकेने पाकिस्तानच्या बाबतीत पक्षपाती भूमिका घेण्यास नकार दिलेला आहे आणि सर्जिकल कारवाई करण्याचा भारताचा हक्क मान्य केला आहे. त्यामुळे अमेरिकेचे निश्‍चित धोरण स्पष्ट होत नाही अमेरिका पाकिस्तानपासून अंतर राखून राहण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. जगाच्या राजकारणातली मांडणी अशारितीने बदलली जात आहे. तिच्यामुळेसुध्दा तिसर्‍या महायुध्दाचे ढग जमा झाल्यागत वाटत आहेत.

Leave a Comment