१४०च राहणार ट्विटर संदेशाची वर्णाक्षर मर्यादा

twitter
वॉशिंग्टन : ट्विटर या मायक्रोब्लाँगिंग संकेतस्थळावर संदेशाची वर्णसंख्या मर्यादा १४० ही पूर्वी होती तशीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मर्यादा १००० करण्याचा संकेतस्थळाचा विचार होता, पण तो रद्द करण्यात आला आहे. ट्विटरचे मुख्यकार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी सांगितले, की १४० वर्णाक्षरांची मर्यादा कायम राहणार आहे. ती ट्विटरची ओळख बनली आहे त्यामुळे ती बदलली जाणार नाही, काही वेळा बंधने घालून घेणे चांगले असले व त्यामुळे संदेशात संक्षिप्तता आहे ती चांगलीच आहे. ट्विटरला आज दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यापार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली.

पहिला ट्विट संदेश २१ मार्च २००६ रोजी पाठवला गेला होता व तो जस्ट सेटिंग अप माय ट्विटर असा होता. ट्विटरची वर्णाक्षर मर्यादा १००० करण्याचा विचार होता, त्यामुळे ग्राहक वाढतील, असे बोलले जात होते, पण तसा निर्णय घेतला गेला नाही. वर्णाक्षरांची मर्यादा वाढवली तर संदेशातील जलदता, समाज माध्यमाने निर्माण केलेली वेगळी संस्कृती यांना धक्का लागेल असे लोकांचे मत होते व ते डोर्सी यांनी मान्य केले आहे असे दिसते. डोर्सी यांनी असे सांगितले, की वापरकत्र्यांच्या संदेशांना कात्री लावली जाणार नाही, संदेशाच्या स्वरूपातील मजकूरही काढला जाणार नाही. कंपनीची याबाबतची मानके पाळली जातील.

ट्विटरने नियंत्रणांना विरोध केला आहे, कुणी कुणाला अनुसरावे यावर आम्ही निर्बंध घालणार नाही, जगातील महत्त्वाच्या गोष्टी लोकांना पाहता आल्या पाहिजेत. काही वेळा ट्विट संदेशाने हसाचार होते तो आमच्या सेवा मानकांच्या विरुद्ध आहे, त्यात लोकांच्या हाती आम्ही नियंत्रण ठेवले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मानक कंपनी पाळत आहे. ट्विटरचा वापर सोपा करीत आहे. माहितीचा अखंड प्रवाह चालू राहील याची दक्षता घेतली जात आहे, कंपनीने डायजेस्ट सारखे मोमेंट्स हे नवे फीचर दिले आहे व अलिकडेच ट्विटर संदेशांचा क्रमही टाइमलाईनमध्ये ठरवता येतो.

ट्विटरचा महसूल २.९५ अब्ज डॉलर्स होता तो आता जागतिक पातळीवर कमी होऊन २.६१ अब्ज डॉलर्स इतका खाली येणार आहे. ट्विटरचे ३२ कोटी वापरकत्रे असून त्यात २५.४ कोटी अमेरिकेच्या बाहेरील आहेत. २०१४ मध्ये ट्विटरचा महसूल १.४ अब्ज डॉलर्स होता तो २०१५ मध्ये २.२ अब्ज डॉलर्स झाला आहे, तो बहुतांश जाहिरातीतून मिळालेला आहे. २०१४ मध्ये कंपनीचा तोटा ५७.७० कोटी डॉलर्स होता तर २०१५ मध्ये तो कमी होऊन ५२.१० कोटी झाला.