
सातारा – नासाच्या पेलोडवर साताऱ्यातील गुरुकुल इंग्रजी माध्यमातील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कु.अनुष्का नामदेव तेलोरे हिने काढलेले चित्र वापरले जाणार असून तिला मिळालेला हा सन्मान जागतिक पातळीवरील आहे. नासाने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत हजारो चित्रे आली होती त्यातून तिला हा सन्मान मिळाला आहे.
नासाच्या पेलोडवर साताऱ्याच्या विद्यार्थिनीने काढलेले चित्र
विज्ञान दिनानिमित्त अमेरिकेच्या नॅशनल स्पेस सोसायटीने कविता, निबंध तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धा भारतातील डॉ.कलाम इनिशिएटिव्ह सोसायटीच्या शाखेनेही घेतल्या होत्या. या स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना विशेष सन्मान देण्यात येणार आहे. सप्टेंबर २०१७ रोजी चंद्रावर पाठवण्यात येणाऱ्या पेलोडवर स्पर्धेत प्रथम विजेत्याचे चित्र, त्याच्या शाळेचे नाव कोरण्यात येणार आहे. सॅटेलाईट लाँच व्हेइकलचा (एसएलव्ही) समोरचा भाग म्हणजे पेलोड. अनुष्काचे चित्र एसएलव्हीच्या या समोरच्या भागावर वापरले जाणार आहे. या चित्रात तिने भारत देश, तिरंगा तसेच परग्रहावरील सजीवाला पृथ्वीवर येण्यासाठी मार्ग दाखवला आहे. अवकाश यान तसेच काही बारकाव्यातून देशाची, पृथ्वीची ओळख करून दिली आहे. या मोहिमेचे नेतृत्व भारत करतो आहे हे ही तिने दाखवले. या बारकाव्यांनी तिच्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाला. तिला संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी प्रोत्साहन दिले तर चित्रकला शिक्षिका सुप्रिया कुष्टे, सोनाली काटकर तसेच मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, लीना जाधव, विश्वनाथ फरांदे यांनी मार्गदर्शन केले.
