अर्थसंकल्पामुळे घरखर्चाचे वाजणार तीनतेरा !

budget
नवी दिल्ली : आपले मासिक भाडे सर्वसाधारण बजेटनंतर वाढण्याची शक्यता असून काही वस्तूंवरील जकात करात मिळणारी सूट बंद करण्याचा सरकार विचार करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर काही वस्तूंवर कमी कर लावण्यात येत असून त्यात वाढ होऊ शकते. जीएसटीचा मार्ग सुकर करण्याच्या उद्देशाने हे सर्व करण्याची तयारी सरकार करीत असल्याने घरखर्च वाढण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ग्रीन टी, काही डेअरी उत्पादनांसह योगर्ट, चीज, आईस्क्रीम, फ्रोजन फूड प्रॉडक्ट्स, पास्ता, पॅकबंद फ्रूट ज्यूस आणि सोयामिल्क यावर जकात कर लावला जाऊ शकतो किंवा ज्यावर आधीपासूनच हा कर आहे त्यात साडेबारा टक्के वाढ होऊ शकते. ३०० पेक्षा जास्त वस्तूंवर जकात कर लावण्यात येत नाही. तसेच १.५ कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या उत्पादकांनासुद्धा यातून सूट मिळाली आहे. राज्यातील व्हॅट प्रकरणी उलाढालीची सीमा ८ ते १० लाख रुपये करण्यात आली आहे, तर जीएसटीसाठी ही सीमा २५ लाख होऊ शकते, असेही सांगण्यात आले.

जीएसटीसाठी महसूल तटस्थ दर सूचवणारे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने, दर जेवढा कमी तेवढा वस्तूंवर या दराने जास्त कर घेतला जाऊ शकतो, असे म्हटले आहे. या समितीने १७-१८ टक्क्याच्या मानकाने जीएसटी दर आणि १२ टक्के सवलतीचा दर सूचवला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार ठोस काय आणते आणि सामान्यांचा कितपत विचार करते हे लवकरच कळणार आहे.