‘गूगल’चा कायापालट करणारे सिंघल घेणार निवृत्ती

Amit-Singhal
न्यूयॉर्क: ‘गूगल’ची मुख्य कंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ‘गूगल सर्च’चे प्रमुख अमित सिंघल यांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढील काळात कुटुंबियांना अधिक वेळ देण्यासह समाजसेवा करण्याचा त्यांचा मानस आहे. दि २६ फेब्रुवारी हा सिंघल यांचा ‘गूगल’मधील अखेरचा दिवस असणार आहे.

उत्तर प्रदेशातील झाशी येथे जन्मलेल्या सिंघल यांनी १९८९ मध्ये अयाआयती रुरकी येथून संगणक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर मिसेनोटा विद्यापीठातून एमएस आणि कार्नेल विद्यापीठातून पीएचडी केले. एटी अँड टी लॅबमध्ये काही काळ काम केल्यानंतर त्यांनी सन २००० मध्ये ‘गूगल’मध्ये प्रवेश केला. तोपर्यंत एक सर्वसामान्य ‘सर्च इंजिन’ असलेल्या ‘गूगल’मध्ये त्यांनी कायापालट घडविला. सर्च बरोबरच ‘स्पेल चेक’च्या सुविधा त्यांनी ‘गूगल’मध्ये उपलब्ध करून दिल्या. विश्वासार्ह माहितीचे भांडार उभारण्याबरोबरच जाहिरातींच्या माध्यमातून ‘गूगल’च्या पाठीशी आर्थिक बळ उभारण्याचे श्रेयही सिंघल यांनाच जाते.

सिंघल यांच्या कामाबद्दल त्यांना नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरींगच्या एशियन अॅवॉर्ड सारख्या अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. सिंघल यांची ‘गूगल’मधील जागा जॉन गिनॉड्रिया घेणार आहेत.