आशादायक वर्ष

2016
चला नव्या वर्षाचे स्वागत करू या. गेल्या वर्षात आपल्या देशात काही विशिष्ट लोकांनी देशातले वातावरण बिघडत आहे अशी आरडा ओरड केली. त्यामुळे सरते वषार्र्विषयी काही लोकांच्या मनात काही कटुता आहे पण ती कटुता निष्कारण तर आहेच पण ती राजकीय द्वेषाने प्रेरित आहे म्हणून तिच्यातले तथ्य जाणून घेऊन आपण नव्या वर्षाचे स्वागत करू या कारण नवे वर्ष अनेक अर्थांनी आशादायक आहे. आपल्या देशात नवे वर्षाचे स्वागत करण्यास काही वेगळे औचित्य आहे. आपला देश २०२० साली जगातली महाशक्ती होण्याची शक्यता आहे आणि त्या वर्षाकडे आपण वाटचाल करीत आहोत. एक वर्ष मागे पडले आणि नवे वर्ष पुढे आले की आपण म्हणतो आता तो क्षण समीप आला आहे. तेव्हा २०१६ हे वर्ष सुरू होण्याला भारतात एक नवा आणि आगळावेगळा संदर्भ आहे. हे वर्ष सुरू होत आहे म्हणजे आता २०२० सालाला केवळ पाच वर्षे राहिली आहेत. आजवर आपण अशी वर्षे मोजत होतो पण त्या मोजण्याला एक नकारात्मक किनार असायची. आपण म्हणत होतो की, महाशक्तीचा वायदा केलेले वषर्र् तर जवळ येत आहे पण आपल्या देशात अशा काहीच सुधारणा होत नाहीत की, ज्यामुळे आपल्याला २०२० साली महाशक्ती होण्याचा विश्‍वास वाटावा.

२०१० साली आपणच म्हणत होतो की, आता ते वर्ष केवळ दशकावर येऊन ठेपले आहे पण या देशातले ३० टक्के लोक अजूनही अर्धपोटी आहेत. ज्या देशातल्या ३० टक्के लोकांना दोन वेळा जेवायला मिळत नाही त्या देशाला महाशक्ती होण्याचा मान मिळणार आहे यावर विश्‍वास कसा ठेवायचा ? आपण अगदी अगदी २०१४ सालपर्यंत अशी नकारात्मक भाषा बोलत होतो पण आज नववर्ष दिन साजरा होत असताना आपल्या या भाषेत बदल झाला आहे. भारत देशाला जगात काही किंमत आहे आणि हा देश जगाला आपल्याकडे आकृष्ट करू शकतो अशी आशा आता जागी व्हायला लागली आहे. अशा आशादायक वातावरणात आपण आज नव्या वर्षात पदापर्र्ण करीत आहोत. आपल्या देशातले प्रश्‍न प्रामुख्याने गरिबीशी निगडित आहेत आणि आपल्यासमोरची आव्हाने मुख्यत्वे आर्थिक आहेत. जगासमोर आपण एक महाशक्ती म्हणून येणे ही गोष्ट एका वर्षात घडणारी नाही पण गेल्या २५ वर्षात आपण याबाबत बरीच मजल मारलेली आहे. आपले पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतरच्या भाषणात ही गोष्ट आवर्जुन सांगितली होती. देशाचे कल्याण केवळ आपणच करणार आहोत असा काही आपला दावा नाही असे ते म्हणाले होतेच पण देशाच्या प्रगतीसाठी आजवरच्या पंतप्रधानांनी काहीच केले नाही असेही आपण म्हणणार नाही असेही ते म्हणाले होते.

अर्थात या सार्‍या पंतप्रधानांनी या गोष्टी फार नेटाने करायला हव्या होत्या. त्या तशा झाल्या नाहीत. काही अपवाद वगळता आपल्या देशाची वाटचाल आगामी ५० ते १०० वर्षाचे नियोजन करून चाललेली आहे असे कधी दिसले नाही. पण १९९१ साली देशाने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली तिच्याने ही आपली प्रगतीकडील वाटचाल गतीने सुरू झाली. कारण त्यापूर्वीच्या नेत्यांनी प्रयत्न केले असले तरीही त्या प्रयत्नांचा तात्त्विक आधार चुकीचा होता आणि त्यांचे प्रयत्न याबाबत चाचपडत चाललेले होते. समाजवादी अर्थव्यवस्था ही नेहमीच गरिबांच्या नावाचा जप करीत चालवली जात असते. १९९१ पूर्वी तसाच प्रकार सुरू होता. पण ती अर्थव्यवस्था गरिबांचे नाव घेत चालवली जात होती याचा अर्थ ती गरिबांच्या हिताचीच होती असे काही नाही. ४० वर्षांच्या समाजवादी प्रयोेगाने हे दिसूनही आले. म्हणून आपल्या देशाची अर्थव्यवस्था बदलण्यात आली. तिचे श्रेय नरसिंहराव यांना आहे, पण ते काही गांधी नेहरू घराण्यात जन्माला आले नव्हते म्हणून त्यांच्या नावाचा गवगवा करीत नाही. पण त्यांनी देशाच्या अर्थकारणाची दिशा बदलली.

ती नवी अर्थव्यवस्था गरिबांच्या नावाचा जप करीत राबवली गेलेली नाही पण तिच्याच साह्याने देशाचे आणि पर्यायाने गरिबांचेही कल्याण होऊ शकते हे गेल्या २५ वर्षात दिसून आले आहे. आपण जी अर्थव्यवस्था राबवताना कोणाच्या नावाचा जप करतो यावर तिचे फलित अवलंबून नसते तर शेवटी तिचा लाभ कोणाला मिळतो यावर ते अवलंबून असते पण आपल्या देशात गरिबांचे नाव घेत राजकारण करण्याचा पायंडा पडला आहे. पण मुक्त अर्थव्यवस्थेच्या २५ वर्षाच्या कालावधीत याच व्यवस्थेने गरिबांचे जीवनमान सुधारेल असे दिसून आले आहे. हीच आपल्या देशाची महाशक्ती होण्याकडे होणारी वाटचाल आहे. ती धीमेपणाने होत होती. आता गेल्या काही महिन्यांत या सार्‍या व्यवस्थेतल्या काही विकृती कमी होताना दिसत आहेत. आपली प्रगती होत होती पण तिला भ्रष्टाचाराची कीड लागली होती. केन्द्रात सत्तेवर बसलेले उच्चपदस्थ नेतेच भ्रष्ट झाले होते. त्यामुळे या देशावर पंतप्रधानांना न्यायालयाचे समन्स आलेले पहावे लागत होते. मात्र या व्यवस्थेत नवे नेतृत्व पुढे येताच मोठा बदल झाला. पूर्वी एखाद्या केन्द्रीय मंत्र्यावर काही आरोप झाला नाही असा एखादा महिनाही जात नव्हता पण आता गेल्या १९ महिन्यात एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा अारोप झालेला नाही. भ्रष्टाचाराच्या बाबतीत वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही जे घडणार नाही ते अशा एका बदलाने घडू शकते. हे दिसून आले आहे. आपण महाशक्ती होण्याकडे वाटचाल करीतच आहोत पण या दिशेने होणार्‍या प्रयत्नांना एक मोठा धक्का देण्याची गरज होती तो धक्का आता दिला जात आहे. म्हणून येते वर्ष आशादायक वाटत आहे.