
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल नेटवर्किंग माध्यमांवर बंदी आणण्याची याचिका फेटाळली असून फेसबुक, व्हॉट्सअॅपवरुन प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह आणि अश्लील पोस्टवर कशाप्रकारे अंकुश ठेवता येईल, याबाबत न्यायालयाने केंद्राकडे विचारणा केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली फेसबुक, व्हॉट्सअॅपवरील बंदीची याचिका
न्यायालयाने कोर्टाने केंद्र सरकारला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बलात्काराचे व्हिडिओ किंवा सेक्स रॅकेट चालत असल्याची उदाहरणे समोर आल्याने या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितले आहे. दोन्ही घटना घडल्यानंतरही व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल प्लॅटफॉर्मविरोधात कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती.
मोबाईलवरुन सेक्स व्हिडिओ शेअर केल्यामुळे कोणत्या यूझरने अपलोड केले आणि कोणी शेअर केले, हे ओळखणे कठीण असल्याचे केंद्राने न्यायालयात सांगितले होते. फोनऐवजी कॉम्प्युटरवरुन अपलोड झाले असते तर आरोपी सहज शोधता आले असते, असेही मत केंद्राने यावर व्यक्त केले होते.
फेसबुक, व्हॉट्सअॅपवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका हैदराबादेतील एका स्वयंसेवी संस्थेने केली होती. व्हॉट्सअॅपवरुन प्रसारित होणाऱ्या मजकुरावर लक्ष ठेवण्याचे आदेश केंद्राला देण्याची मागणीही न्यायालयाकडे केली आहे . न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करताना साईट ब्लॉक करणे हा उपाय नसल्याचे सांगितले. उद्या तुम्ही मोबाईलवर बंदीची मागणी कराल, असे ठणकावत याचिकाकर्त्याने सुचवलेला उपाय निरुपयोगी असल्याचे सांगितले.
