
भारतातून अमेरिका आणि ब्रिटनमध्ये शिकायला जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे. भारतातले विद्यार्थी लाखोंच्या संख्येने अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया किंवा जर्मनीला शिकायला जातात. हा नेमका कल काय आहे याचे आकलन अजून होत नाही. भारतातल्या मुलांना आपल्या देशात का शिकावेसे वाटत नाही हा तर चिंतेचा विषय आहेच. पण त्यांना हवे असलेले उच्च शिक्षण भारतात त्या दर्जाने दिले जात नाही ही एक त्यांची खंत असावी असे वाटते. मात्र त्याला दुसरीही एक बाजू आहे. देशात शिक्षण चांगले मिळत असले तरी अजूनही भारतात परदेशात जाऊन शिकण्याला प्रतिष्ठा दिली जाते आणि त्या प्रतिष्ठेपायीसुध्दा भारतातले बरेच विद्यार्थी परदेशात जाऊन शिकत असावेत असे समजण्यास वाव आहे. कारण हे विद्यार्थी परदेशात जाऊन जे शिक्षण घेतात ते तर भारतात सहज उपलब्ध आहे. तेव्हा हा शिक्षणाच्या उपलब्धतेचा प्रश्न नाही.
भारतीय विद्यार्थ्यांचा कल
परदेशात जाऊन शिकणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी बराच खर्च येतो आणि भारतातल्या पालकांची तेवढी ऐपत आता निर्माण झाली आहे असे दिसते. एक प्रकारे मुक्त अर्थव्यवस्थेने निर्माण झालेल्या समृध्दीवर या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येने नक्कीच प्रकाश पडला आहे. भारतातसुध्दा शिक्षण महाग झाले आहे आणि तरीही निदान समाजातला एक वर्ग तरी मोठ्या संख्येने पैसे खर्च करून आपल्या मुलांना हे महागडे शिक्षण देत आहे. गतवर्षी भारतातून अमेरिकेत जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या २९ टक्क्यांनी वाढली, असे एका पाहणीत आढळले आहे. असाच प्रकार ब्रिटनच्या बाबतीतही आढळला होता. ब्रिटनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांमुळे तिथे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते आणि भारतातले विद्यार्थी हे लंडनमधल्या रोजगार निर्मितीच्या क्षेत्रातील तिसर्या क्रमांकाचे क्षेत्र होते.
अमेरिकेतही भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने जात आहेत. सध्या अमेरिकेत १ लाख २ हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात गतवर्षी ३० हजार विद्यार्थ्यांची भर पडली. १९५४-५५ सालपासून एकाच वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याचा हा विक्रम मानला जात आहे. साधारण एवढीच वाढ २००१ साली एकदा झाली होती. अन्य वर्षात ती कधी ५ टक्के तर कधी १० टक्के अशी झाली. यावर्षी मात्र हा आकडा २९ टक्क्यांपर्यंत वर गेला. भारतातून तिकडे जाणार्या विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीचा अंदाज घेतला असता असे लक्षात आले आहे की त्यातील बहुसंख्य विद्यार्थी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी तिकडे जात आहेत. म्हणजे त्यांच्या परदेशी जाऊन शिकण्याच्या वृत्तीचा भारताला फायदाच होणार आहे.
